मावळ लोकसभा निवडणूक : उमेदवारांच्या मताधिक्यावरून मावळात पैजा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 13:17 IST2019-05-18T13:11:38+5:302019-05-18T13:17:22+5:30
सलग दहा वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला मावळचा गड शिवसेना राखणार, की सेनेच्या बालेकिल्ल्यात घड्याळाचा गजर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ लोकसभा निवडणूक : उमेदवारांच्या मताधिक्यावरून मावळात पैजा....
-विजय सुराणा -
वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले. झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार अन् कोण, कोणत्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेणार याच्या चर्चेचे गु-हाळ सुरू आहे. केवळ चर्चाच नाही, तर मावळ तालुक्यात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे की आघाडीचे पार्थ पवार यांच्यापैकी कोणाला मताधिक्य मिळणार यावरून गावोगावी लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे रिंगणात उतरल्याने ही लढत चुरशीची झाली आहे. सलग दहा वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला मावळचा गड शिवसेना राखणार, की सेनेच्या बालेकिल्ल्यात घड्याळाचा गजर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे लोकसभेतील विधानसभानिहाय मताधिक्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीतील आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे. मावळात कौल युती की आघाडीच्या बाजूने लागणार याकडे लक्ष आहे.
..........
विधानसभा इच्छुकांची लोकसभेतच मोर्चेबांधणी
मावळ विधानसभेत दोन्हीपैकी एका उमेदवारास केवळ पाच ते दहा हजारांच्या घरात आघाडी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार बाळा भेगडे, सुनील शेळके, रवींद्र भेगडे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब नेवाळे, बबन भेगडे, अर्चना घारे, गणेश खांडगे, गणेश ढोरे, बाबूराव वायकर ही नावेही इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून संधी मिळण्यासाठी सर्वच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
........राष्ट्रवादीचे सर्व गट आले एकत्र
मावळ तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ पक्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचे तर सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादीमधील गटबाजीचा भाजपाला अनेकदा फायदा झाला. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सर्व गट एकत्र आले होते. त्यात कॉँग्रेसची साथ व मनसेचा पाठिंबा मिळाल्याने राष्ट्रवादीला आशा आहे. युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची भिस्त भाजपाच्या पक्ष संघटनेवर अवलंबून होती. त्यात शिवसेनेचा एक गट अलिप्त होता. तरीही सुप्त मोदी लाटेचा फायदा होईल अशी शक्यता महायुतीकडून व्यक्त होत आहे.