Pimpri Chinchwad: पोलिसांमध्ये तक्रार करणाऱ्यावर हल्ला; नेहरूनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:24 IST2023-04-08T13:23:54+5:302023-04-08T13:24:21+5:30
शिवीगाळ करत खंजीराने मारहाण...

Pimpri Chinchwad: पोलिसांमध्ये तक्रार करणाऱ्यावर हल्ला; नेहरूनगरमधील घटना
पिंपरी : पोलिसांमध्ये तक्रार दिली म्हणून शिवीगाळ करत खंजीराने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ५) नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी साहिल हनुमान पवार (वय २५, रा. नेहरूनगर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ६) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अभी गायकवाड माॅन्टी वाल्मीकी (दोघे रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गाडीवरून जात असताना आरोपी अभी याने त्यांना थांबवून गाडीची चावी काढून घेतली, तसेच फिर्यादी यांच्या छोट्या भावाने आपल्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली म्हणून त्याला फोन लावून बोलावून घेण्यास फिर्यादी यांना सांगितले.
फिर्यादी यांनी त्याचा छोटा भाऊ राेहन याला फोन केला असता तो आणि त्याचा मित्र गणेश जाधव तेथे आले. त्यावेळी आरोपी मॉन्टी याने खंजीर काढला. त्यावेळी रोहन आणि गणेश पळून गेले. आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली, तसेच फिर्यादी यांना ‘कितना बचेगा, आज तो तेरा खेल खत्म ही करना है,’ असे म्हणत उलटा खंजीर मारून जखमी केले. फिर्यादी यांच्यावर नेहरूनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.