आमदार रोहित पवार हातात काठी घेऊन बिबट्याला शोधायला निघतात तेव्हा...
By महेश गलांडे | Updated: December 11, 2020 13:28 IST2020-12-11T13:16:01+5:302020-12-11T13:28:01+5:30

करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात विशेषत: नरभक्षक ज्या भागात चिखलठाण,वांगी, बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
भय इथले संपत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील कामे करण्यासाठी शेतकरी बाहेर पडत नाहीत. बाहेर गेलाच तर काठ्या, कुऱ्हाडी, भाले, जंबिया आदी हत्यारे घेऊन जात आहे तर फटाके फोडून आवाज करून बिबट्यापासून संरक्षण करीत आहेत.
चिखलठाण येथून निसटलेला बिबट्या शेटफळ-दहिगीव शिवारात असल्याच्या पाउलखुणा वन विभागाने पाहून बुधवारी दिवसभर शोध घेतला; पण बिबट्याची कोणतीच हालचाल दिसून आली नाही.
वन विभागास नरसोबावाडी येथील माहिती समजल्यानंतर सांगवी नं.३ नरसोबावाडी शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आल्याने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याच्या हालचाली टिपण्यात आल्या. शिवाय डॉगस्कॉडच्या मदतीने शोध घेण्यात आला.
बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसल्याने या परिसरात पिंजरे लावण्यात आली आहेत, पण बिबट्या दिसलाच नाही. करमाळा तालुक्यात २०१८ मध्ये उंदरगाव येथे पकडला गेलेला बिबट्या प्राण्यावर हल्ला करीत होता.
हा बिबट्या नरभक्षक असून, तो माणसाचे रक्त व मांसाला चटावलेला आहे. त्याला जिवंत अथवा ठार मारण्यासाठी दोन शार्पशूटर व तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.
कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. गस्त वाढवलेली असून, पिंजरे लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती उप-वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार हेही या बिबट्याच्या शोधात रात्री फिरत होते.
सांगवी हे गाव आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघाशेजारीच आहे, त्यामुळे रोहित यांनी गावात जाऊन तेथील तरुणांसमवेत हातात काठी घेऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रोहित यांनी यावेळी वन अधिकारी आणि शार्प शुटर यांच्याशीही संवाद साधला, तसेच गावकऱ्यांना धीर देण्याचं काम केलं. सांगवी इथं जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
माझ्या मतदारसंघात व शेजारच्या तालुक्यातही बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र प्रयत्नशील आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून काल करमाळा तालुक्यातील वांगी सांगवी इथं जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि पोलीस व वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी करत असलेल्या कामाची माहिती घेतली, अस रोहित पवार यांनी म्हटलंय.
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या अंजनडोह येथील जयश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे अंजनडोह येथे शुक्रवारी भेट देणार आहेत. त्यानंतर अंजनडोह येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गावकऱ्यांशी चर्चा व अधिकाऱ्याबरोबर बैठक घेणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित राहणार आहेत.