उपमुख्यमंत्री मानत नाही म्हणणारे पडळकर अखेर अजित पवारांसमोरच बसले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 08:08 PM2023-09-21T20:08:22+5:302023-09-21T20:28:06+5:30

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणाच्या मुद्दयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. आरक्षणाची मागणी करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणाच्या मुद्दयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. आरक्षणाची मागणी करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले होते.

पडळकरांनी अजित पवारांवर बोचरी टीकाही केली होती. तसेच आपण त्यांना उपमुख्यमंत्री मानत नाही, त्यामुळे पत्र देण्याचा विषयच नाही, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर, पडळकरांना पक्षातील त्यांच्या वरिष्ठांकडून सुनावण्यात आलं.

फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संस्कार दाखवत त्यांना सुनावले. पडळकरांचं विधान योग्य नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं. तर, बावनकुळे यांनी अजित पवारांची दिलगिरी व्यक्त केली

दरम्यान, धनगर समाज आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री, संबंधित पदाधिकारी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. त्यास, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. ज्या अजित पवारांना आपण मानत नाही असे पडळकर म्हणाले. त्याच अजित पवारांसमोर त्यांना आज बैठकीला उपस्थित राहावे लागले.

शासन व प्रशासन स्तरावर वैयक्तिक मानने किंवा न मानने महत्त्वाचे नसते, तर प्रोटोकॉलनुसारच कार्यवाही करावी लागते. त्यामुळे, मनात असो किंवा नसो पडळकरांना उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच बैठकीला बसावे लागल्याचं दिसून आलं.

शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले.

"शासन निर्णय काढण्याच्या प्रक्रियेत काही अडचण आल्यास आवश्यकतेनुसार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अभ्यास करण्यासाठी माजी न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन या बैठकीची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, तसेच पडळकरांचाही उल्लेख केला आहे.