राज्यातील महापालिकांवर भाजपचे वर्चस्व; महत्त्वाच्या आठ शहरांत भाजपचे महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:51 IST2026-02-07T15:40:59+5:302026-02-07T15:51:07+5:30

राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले असून, त्यात भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

राज्यातील एकूण ८ महत्त्वाच्या महापालिकांच्या महापौरपदी भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. नागपूरमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचा विजय झाला, तर अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाने बाजी मारली आहे.

नागपूर: नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला राखला आहे. भाजपच्या नीता ठाकरे यांची शहराच्या ५५ व्या महापौरपदी निवड झाली. त्यांनी काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा १०४ विरुद्ध ३६ अशा मताधिक्क्याने पराभव केला. नीता ठाकरे या नागपूरच्या ८ व्या महिला महापौर ठरल्या आहेत. तर उपमहापौरपदी लीला हाथीबेड यांनी विजय मिळवला.

कोल्हापूर: ऐतिहासिक विजय मिळवत कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. कोल्हापूर महापालिकेत पहिल्यांदाच महायुतीचा भगवा आणि गुलालाची उधळण पाहायला मिळाली. उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग निवडून आले.

सोलापूर: सोलापूरमध्ये मोठी राजकीय खेळी यशस्वी ठरली. विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे विनायक कोंड्याल यांची महापौरपदी, तर ज्ञानेश्वरी देवकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

जळगाव: जळगावमध्ये भाजपने १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे यांना बसवण्यात यश मिळवले, तर शिंदे गटाचे मनोज चौधरी उपमहापौर झाले.

नाशिक: नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके महापौर झाल्या. शिंदे गटाच्या विलास शिंदे यांनी उपमहापौरपद मिळवले.

धुळे: संख्याबळाच्या जोरावर भाजपने धुळ्यात विजय मिळवला. मायादेवी परदेशी महापौर, तर ज्योत्सना पाटील उपमहापौर झाल्या.

अमरावती: अमरावतीत महायुतीने विजयाची परंपरा कायम ठेवली असून भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर झाले आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे यांनी उपमहापौरपद भूषवले.

पिंपरी-चिंचवड: औद्योगिक नगरीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपचे रवि लांडगे यांची महापौरपदी तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

अहिल्यानगर: येथे राजकीय समतोल पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती गाडे यांची महापौरपदी, तर भाजपच्या धनंजय जाधव यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.