ऑस्ट्रेलियाचा विक्रम थोडक्यात बचावला; कॅरेबियन लीगमध्ये विक्रमांची आतषबाजी

जमैका, कॅरेबियन प्रीमिअर लीग : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी धावांचा पाऊस पडला. युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलनं खणखणीत शतकी खेळी करून ट्वेंटी-20 क्रिकेटमधील शतकांची संख्या 22 वर नेली. मात्र, त्याची शतकी खेळी व्यर्थ ठरवत सेंट किट्स अॅण्ड नेव्हील्स पॅट्रोओट्स संघाने बाजी मारली. जमैका थलावाज आमि पॅट्रोओट्स संघांमधील या सामन्यात तब्बल 39 षटकांत 483 धावांचा पाऊस पडला.

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये आतापर्यंत एकाही संघाला 230 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता. जमैका थलावाजचे 4 बाद 241 धावांचे लक्ष्या पॅट्रोओट्सने 6 बाद 242 धावा करून पार केले.

एव्हिन लुईसने 17 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. कॅरेबियन लीगमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी 2014मध्ये सोहैल तन्वीर आणि 2018मध्ये किरॉन पोलार्डने 18 चेंडूंत पन्नास धावा केल्या होत्या.

जमैका थलावाज संघाने या सामन्यात एकूण 21 षटकार ठोकले. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे, तर कॅरेबियन लीगमधील अव्वल कामगिरी आहे. यापूर्वी गतवर्षी कॅरेबियन लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने 18 षटकार खेचले होते.

ख्रिस गेलचे हे ट्वेंटी-20 प्रकारातील 22 वे शतक ठरले. मिचेल क्लिंजर 8 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. ट्वेंटी-20 त शतक झळकावूनही गेलला सहा वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात 37 षटकारांची आतषबाजी झाली. यापूर्वी 2018मध्ये अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये बल्ख लीजंट्स आणि काबुल झ्वानन यांच्यातील सामन्यात 37 षटकार खेचले होते.

ओशाने थॉमसने या सामन्यात 53 धावा दिल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही दुसरी महागडी कामगिरी ठऱली. हा विक्रम करनवीर सिंग ( 2014 आयपीएल) आणि आफ्ताब आलम ( 2017 अफगाणिस्तान स्थानिक ट्वेंटी-20) यांच्या नावावर आहे. या दोघांनी 54 धावा दिल्या.

ख्रिस गेल आणि चॅडविक वॉल्टन यांनी 162 धावांची भागीदारी केली. कॅरेबीयन लीगमधील कोणत्याही विकेटसाठीही ही सर्वोत्तम भागीदारी आहे. यापूर्वी मार्लोन सॅम्युअल्स आणि ओ पीटर्स यांनी 2014साली गयानाविरुद्ध चौथ्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली होती. आंद्रे रसेल आणि के लुईस यांनी सहाव्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली होती.

ख्रिस गेलनं 116 धावांची खेळी करून कॅरेबियन लीगमधील दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर केला. या विक्रमात आंद्रे रसेल 121 धावांसह अव्वल स्थानावर आहे.

पॅट्रोओट्स संघाने 242 धावांचे लक्ष्य पार करताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. 2018मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडने ठेवलेले 244 धावांचे लक्ष्य पार केले होते.