अमेरिकेत भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, स्टेडियमला दिलं दोन भारतीयांचं नाव!

अमेरिकेतही आता चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. कारण अमेरिकेत नव्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कसं आणि नेमकं कुठं आहे हे स्टेडियम जाणून घेऊयात...

अमेरिकेतील टेक्सास स्थित एनजीओ इंडिया हाऊस ह्यूस्टननं (India House Houston) नुकतंच भव्य क्रिकेट स्टेडियमचं उदघाटन केलं आहे.

विशेष म्हणजे या स्टेडियमला दोन भारतीयांचं नाव देण्यात आलं आहे. डॉ. दुर्गा अग्रवाल (Dr. Durga Agarwal) आणि सुशीला अग्रवाल (Sushila Agarwal) यांचं नाव या स्टेडियमला देण्याचं निश्चित झालं आहे.

डॉ. दुर्गा आणि सुशील अग्रवाल या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांच्या आयोजनासाठी या स्टेडियमच्या उभारणीमध्ये मोठं योगदान दिलं आहे. डॉ. दुर्गा अग्रवाल पिपिंग टेक्नॉलॉजी अँड प्रोडक्ट्सच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. याशिवाय त्या इंडिया हाऊसच्या संस्थापक सदस्य आणि ट्रस्टी देखील आहेत.

अमेरिकेत क्रिकेट आणण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. कोरोना प्रोटोकॉलचं पालन करत गेल्या आठवड्यात मोजक्या भारतीय अमेरिकी नागरिकांच्या उपस्थितीत स्टेडियमच्या नावाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं.

सध्या या स्टेडियमचा उपयोग कोरोना चाचणी, आरोग्य परिक्षण, जेवणाची व्यवस्था, मोफत योगसाधना, भाषा, कला, फूटबॉल आणि क्रिकेटशी संबंधित इतर कामांसाठी वापर केला जात आहे.

सध्या या स्टेडियमचा उपयोग कोरोना चाचणी, आरोग्य परिक्षण, जेवणाची व्यवस्था, मोफत योगसाधना, भाषा, कला, फूटबॉल आणि क्रिकेटशी संबंधित इतर कामांसाठी वापर केला जात आहे.

अग्रवाल यांनी या स्टेडियमच्या उभारणीसाठी मोठं अर्थसहाय्य देखील केलं आहे. स्टेडियममध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचा आयोजन केलं जाणार आहे. एकूण ५.५ एकर परिसरात हे स्टेडियम व्यापलेलं असून मोठ्या थाटात याचं उदघाटन करण्यात आलं.

अमेरिकेतील या नव्या भव्य स्टेडियमवर आगामी काळात क्रिकेट सामन्यांचंही आयोजन केलं जाणार आहे. इंडिया हाऊसचं अमेरिकेतील भारतीय समाजासाठी एक आधारस्तंभ आहे. देशातील विविध संस्कृतींना एकत्र आणण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. येत्या काळात या स्टेडियमवर स्थानिक क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत, असं अग्रवाल म्हणाले.