रशीदच्या फिरकीची जादू; 4 बॉलमध्ये 4 विकेट्स...

भारतीय संघाला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याचवेळी देहरादून येथे सुरू असलेल्या ट्वेंटी-20त अफगाणिस्तान संघानं तिसऱ्या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगाणिस्ताननं तिसऱ्या सामन्यात आयर्लंडवर 32 धावांनी विजय मिळवला.

अफगाणिस्ताननं मोहम्मद नबीच्या 81 धावांच्या ( 36 चेंडू, 6 चौकार व 7 षटकार ) जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडला 8 बाद 178 धावा करता आल्या. केव्हिन ओ,ब्रायन ( 74) आणि अँडी बॅल्बीर्नी ( 47) यांचा संघर्ष अपयशी ठरला.

या विजयासह अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा सलग ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. पाकिस्तानने 2018 मध्ये सलग 9 सामने जिंकले होते आणि अफगाणिस्तानने 2018-19 मध्ये सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम केला. त्यांनी 2016-17 मध्ये सलग 11 सामने जिंकले आहेत.

या सामन्यात रशीद खानच्या फिरकीच्या जादूनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यानं 27 धावा देत आयर्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला. या कामगिरीसह त्यानं आतापर्यंत एकाही फिरकीपटूला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये न करता आलेला विक्रम स्वतःच्या नावावर केला.

रशीदने या सामन्यात हॅटट्रिक नोंदवली आणि चौथ्या चेंडूवरही विकेट घेतली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चार चेंडूंत चार विकेट्स घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. यासह त्याने श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या चार चेंडूत चार विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये यापूर्वी ब्रेट ली, जेकब ओराम, टीम साऊदी, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा आणि फहिम अश्रफ या जलदगती गोलंदाजांनाच हॅटट्रिक घेता आली आहे. फिरकीपटून रशीदने या पंक्तीत स्थान पटकावले.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक विकेट्सचा मानही रशीदनं पटकावला. त्यानं आयर्लंडविरुद्ध 10 सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा ( 21 विकेट्स वि. न्यूझीलंड) विक्रम मोडला.