Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले

Mithali raj: सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. या दौऱ्यात मिताली राज हीच केवळ सातत्याने धावा जमवत आहे.

सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. या दौऱ्यात मिताली राज हीच केवळ सातत्याने धावा जमवत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत तिने दोन अर्धशतके फटकावली आहेत. त्याबरोबरच तिच्या नावे एक खास विशेष रेकॉर्डची नोंद झाली आहे.

मिताली राज ही भारताकडून इंग्लंडमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा फटकावणारी महिला आणि पुरुष खेळाडूंमधील पहिली फलंदाज ठरली आहे. मिताली राज ही पहिल्या वनडेत ७२ आणि दुसऱ्या वनडेत ५९ धावा फटकावल्या.

या दोन अर्धशतकी खेळींबरोबरच मिताली राज हिने इंग्लंडच्या भूमीवर १४व्यांदा ५० हून अधिक धावा करण्याची कामगिरी केली. मितालीने आतापर्यंत इंग्लंडमध्ये ४० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात २ शतके आणि १२ अर्धशतके फटकावली आहेत. त्याबरोबरच याबाबतीत मितालीने सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

या क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडमध्ये केवळ २४ सामन्यांमध्ये १३ वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे. यामध्ये ७ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. या ७ मधील ५ शतके त्याने २०१९ च्या विश्वचषकात फटकावली होती.

तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. त्याने ३२ सामन्यात १३ वेळा ५० हून अधिक धावा फटकावल्या. द्रविडने इंग्लंडमध्ये २ शतके आणि ११ अर्धशतके फटकावली.

भारताचा कर्मधार विराट कोहलीसुद्धा या क्रमवारीत मागे नाही आहे. त्याने इंग्लंडमध्ये ३१ सामन्यात १३ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. मात्र विराटला इंग्लंडमध्ये केवळ एकच शतकी खेळी करता आली आहे. तर त्याने १२ अर्धशतके फटकावली आहेत.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनचासुद्धा या यादीत समावेश आहे. त्याने इंग्लंडमध्ये अनेक धडाकेबाज खेळी केल्या आहेत. इंग्लंडमध्ये खेळलेल्या १९ सामन्यात त्याने ८ वेळा ५० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये चार शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.