IPL 2026: नाम बडे और... आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू!

IPL 2025 Performance: आयपीएलचा यंदाचा हंगाम अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी सरस ठरला असला आहे. मात्र, अनेक स्टार खेळाडू संघर्ष करताना दिसले आहेत.

आयपीएलच्या १९ व्या हंगामातील पहिला आठवडा रोमहर्षक ठरला. स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात अनेक अटीतटीच्या लढती आणि धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. दरम्यान, युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर क्रिकेटविश्वावर आपली छाप सोडली आहे. याउलट, अनेक दिग्गज खेळाडू फ्लॉप ठरले आहेत.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत फक्त १२ सामने खेळले गेले असले तरी, सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे अनेक स्टार खेळाडू पहिल्या आठवड्यातील फ्लॉप खेळाडूंच्या यादीत जमा झाले आहेत. या यादीत पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह, चेन्नई सुपरकिंग्जचा यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसन यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

अर्शदीप सिंग: पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला चालू हंगामात अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आले. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने चार षटकांत ४२ धावा दिल्या आणि एकही बळी मिळवला नाही. त्यानंतर सीएसकेविरुद्धच्या सामन्यातही तो महागडा ठरला. या सामन्यात त्याने आपल्या स्पेलमध्ये ४१ धावा दिल्या आणि एकही विकेट मिळवली नाही.

संजू सॅमसन: यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आतापर्यंत संघर्ष करताना दिसला आहे. त्याने राजस्थान, पंजाब आणि आरसीबी या तिन्ही सामन्यात अनुक्रमे ६,७ आणि ९ धावा केल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात संजूने भारतीय संघासाठी मॅच विनर खेळाडू असल्याचे दाखवून दिले. मात्र, त्याचा सध्याचा फॉर्म आता सीएसकेसाठी एक मोठी डोकेदुखी बनला आहे.

कॅमेरॉन ग्रीन: कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात महागडा परदेशी खेळाडू, कॅमेरॉन ग्रीन यालाही आतापर्यंत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले आहे. दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकलेला नाही आणि फलंदाजीमध्येही त्याला कोणतीही महत्त्वपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ग्रीनने १८ धावा केल्या. तर, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, तो केवळ २ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाला.

केएल राहुल: दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज, केएल राहुल याची कामगिरी आश्चर्यकारकपणे निराशाजनक राहिली आहे. दोन डावांमध्ये मिळून, त्याला केवळ १ धावच करता आली आहे; विशेषतः जेव्हा संघाला त्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा होती. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात राहुलला आपले खातेही उघडता आले नाही, तर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ १ धाव काढली.

वरुण चक्रवर्ती:कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यालाही सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत ४८ धावा दिल्या. तर, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अवघ्या २ षटकांत ३१ धावा खर्च केल्या. त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्याचा स्पष्ट अभाव दिसून आला असून, त्याची लाईन आणि लेंथ वारंवार भरकटताना दिसली.