ना कोरोनाचा बहाणा...ना स्लेजिंगचा हातखंडा...टीम इंडियानं असा रोवला विजयाचा झेंडा!

भारतीय संघानं यावेळी ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाला विशेष महत्व आहे. या ऐतिहासिक विजयामागे अनेक गोष्टी दडल्यात जाणून घेऊयात...

कांगारुंच्या धरतीवर जाऊन क्रिकेट खेळणं ही काही सोपी गोष्ट नाहीय. मैदानावरील स्लेजिंगपासून ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा माईंडगेम ते तेथील माध्यमांच्या दबाव या सर्व गोष्टी सहन करत यजमान संघाला क्रिकेट खेळावं लागतं.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांसारखे इतर स्टार खेळाडू संघात नसतानाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघानं लागोपाठ दुसऱ्यांदा कसोटी मालिका विजयाची नोंद केलीय.

अॅडलेड कसोटीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर अवघ्या ३६ धावांवर गारद झाला होता. कांगारुंनी अवघ्या अडीच दिवसात भारतीय संघावर ८ विकेट्सने दमदार विजय मिळवला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी प्राप्त केली होती.

मार्क वॉ आणि रिकी पाँटिंग यांनी तर विराट कोहली आणि शमीसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थित भारतीय संघ पलटवार करू शकणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. कोहलीच्या जागी संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या माईंड गेमवर मात करत संघाला उभं केलं.

रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत दमदार पुनरागमन केलं. रहाणेने कर्णधारी खेळी साकारत मेलबर्नमध्ये शतक ठोकलं. मेलबर्न कसोटी भारताने ८ विकेट्सने जिंकली.

मेलबर्नच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि कांगारुंच्या माजी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंचं लक्ष विचलीत करण्यासाठी नवनवे हातखंडे वापरण्यास सुरुवात केली. भारतीय संघाने कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला होता.

सिडनीमध्ये टीम इंडिया पोहोचल्यानंतर तिथं मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत जातीवाचक कमेंट्स करण्यात आल्या. तर जडेजा आणि हनुमा विहारी या सामन्यात दुखापतग्रस्त झाले. यानंतरही भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा विजयाचा घास हिरावून घेतला आणि तब्बल १३१ षटकं फलंदाजी करत सामना 'ड्रॉ' करण्यात यश मिळवलं.

सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात यश प्राप्त केल्यानंतर भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये पोहोचला. या ठिकाणी गेल्या ३३ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या वाट्याला एकदाही पराजय आलेला नव्हता. याच ठिकाणी कांगारुंना धूळ चारत भारताने इतिहास रचला.

ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्सने धूळ चारत कसोटी मालिका २-१ ने जिंकली. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

भारताने याआधी २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केलं होतं. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश नसल्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला असं बोललं गेलं होतं. पण यावेळी कांगारुंच्या संघात वॉर्नर आणि स्मिथ दोघंही होते. तरीही भारतानं आपला दबदबा कायम ठेवत कांगारुंना आसमान दाखवलं.