भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...

Rishabh Pant on team India Loss, IND vs SA 1st Test: कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने सामन्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंतने भारताची बाजू मांडली.

भारतीय संघाने आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मात्र घोर निराशा केली. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला ३० धावांनी पराभूत व्हावे लागले.

कोलकाता येथील घरच्या मैदानावर आफ्रिकेने चौथ्या डावात भारताला १२४ धावांचे माफक आव्हान दिले होते. पण भारताला शंभरीही गाठता आली नाही. टीम इंडियाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला.

दक्षिण आफ्रिकेकडून सिमोन हार्पर याने दोन्ही डावांत ४-४ बळी घेत भारतीय फलंदाजीला सुरूंग लावला. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने सामन्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंतने भारताची बाजू मांडली.

पंत म्हणाला, "आज झालेला पराभव हा विचार करायला लावणारा आहे. पण या पराभवाने फार काळ निराश राहूनही चालणार नाही. आम्हाला दिलेले टार्गेट खरं पाहता चेस करता येणे शक्य होते. पण आमच्यावरील दडपण वाढत राहिले."

"आमच्या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. पण त्यांचा नीट वापर करता आला नाही. टेम्बा बवुमा आणि बॉश यांनी चांगली झुंज दिली. त्यांच्या भागीदारीचा आम्हाला खऱ्या अर्थाने फटका बसला. खेळपट्टीही नंतर त्यांना मदत करत होती."

"या खेळपट्टीवर १२० धावांच्या आसपासचा खेळ हा कायमच आव्हानात्मक असतो हे आम्हाला माहिती होते. पण घरच्या परिस्थितीत आम्हाला ते दडपण सांभाळून चांगली कामगिरी करायला हवी होती."

"आजच्या पराभवाबाबत आम्ही अद्याप नीट विचार केलेला नाही. आमच्याकडून नक्कीच काही चूका झाल्या आहेत. त्या चुका कशा सुधारायच्या याचा आम्ही अजून विचार केलेला नाही, पण आम्ही नक्कीच दमदार कमबॅक करू," असा विश्वास पंतने व्यक्त केला.