Suresh Raina autobiography : सुरेश रैनानं सीनियर खेळाडूंबाबत केला धक्कादायक खुलासा, ग्रेग चॅपेल चुकीचे नसल्याचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 12:37 PM2021-06-14T12:37:22+5:302021-06-14T12:39:35+5:30

Suresh Raina autobiography : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याचे ग्रेग चॅपेल यांच्याबद्दलचे मत काही वेगळे आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासात ग्रेग चॅपेल यांची मुख्य प्रशिक्षकपदाची कारकीर्द वादाग्रस्त ठरली. चॅपेल व तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली यांच्यात उघडउघड वाद झालेले पाहायला मिळाले. चॅपेल यांनी तर गांगुलीला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यामुळे इतर सीनियर खेळाडूंमध्ये अस्वस्थता पसरली होती. पण, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याचे ग्रेग चॅपेल यांच्याबद्दलचे मत काही वेगळे आहे.

चॅपेल यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं अनेक अविस्मरणीय विजय मिळवले. पण, 2007च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या फेरीतील टीम इंडियाचे अपयश हेच सर्वांनी लक्षात ठेवले. 15 ऑगस्ट 2020 ला महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैनानं चॅपेल यांच्या कारकीर्दीतील काही मुद्दे सांगितले.

सुरेश रैनानं त्याच्या आत्मचरित्रात ग्रेग चॅपेल यांच्या कारकीर्दिबाबत काही मुद्दे मांडले आहेत. महेंद्रसिंग धोनी, इरफान पठाण, आर पी सिंग, इत्यादी युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय रैनानं चॅपेल यांना दिले आणि धावांचा पाठलाग करताना त्यांची एक दमदार तुकडी चॅपेल यांनी तयार केल्याचे, रैनानं लिहिले आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या प्रमुख खेळाडूंनी काही धक्कादायक प्रसंगही सांगितले आहेत. चॅपेल हे मुख्य प्रशिक्षक असताना काही सीनियर खेळाडू त्याची थट्टा करायचे, असे रैनाने सांगितले.

''मला आठवतंय, एक सीनियर खेळाडू माझ्याजवळ आला अन् माझी थट्टा करू लागला. मला अतिरिक्त सराव मिळायला हवा, कारण मीच सामन्यात चांगली फलंदाजी करणार आहे, असे तो मला म्हणू लागला. मी त्याला लगेच उत्तर दिले, की मला जॉईन कर, त्या खेळाडूला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण, रँगिंग हे माझ्यासाठी काही नवीन नव्हतं, मला त्याची सवय झाली होती. हॉस्टेल लाईफचे आभार,''असे रैनानं सांगितले.

तो पुढे म्हणाला,''पण, माझी कोणी रँगिंग केली असं मी म्हणणार नाही. रँगिंग काय असते, हे मला चांगले माहीत आहे. असेही काही प्रकार घडलेत की, जेव्हा आम्ही सीनियर खेळाडूंना सकाळी भेटून हाय हॅलो करायचो, तेव्हा त्यांच्याकडून तशी प्रतिक्रिया नाही मिळायची. पण, मी कधीच ते मनाला लावून घेतले नाही.''

युवा खेळाडूंना घडवण्यात राहुल द्रविड यानं महत्त्वाची भूमिका बजावल्याचे रैनाने सांगितले. चॅपेल यांच्या कार्यकाळात संघ संकटात असतानाही द्रविडनं त्याचा परिणाम युवा खेळाडूंवर होऊ दिला नाही.

तो म्हणाला,''राहुल द्रविड हा खरंच खूप चांगला कर्णधार होता. संघाबाहेर चाललेल्या वादाचा आमच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, याची काळजी तो घेत होता. त्यामुळे युवा खेळाडूंना या परिस्थितीपासून दूरच ठेवले. जेव्हा जेव्हा मिटिंग्स व्हायच्या तेव्हा आम्ही सरावाला जायचो, बंद दरवाजात काय चाललेय, याची आम्हाला काहीच कल्पना नसायची.''

''माझ्या नजरेतून पाहाल, तर ग्रेग चॅपेल चुकीचे नव्हते. संघानं केवळ एकाच खेळाडूवर अवलंबून न राहता, प्रत्येकानं योगदान द्यायला हवं, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. पराभवानंतर ते झापायचे, परंतु त्यांचा राग हा सीनियर खेळाडूंकडे होता.

सुरेश रैनानं भारताकडून 18 कसोटी, 226 वन डे व 78 ट्वेंटी-20 सामने खेळले. त्यानं कसोटीत 786, वन डेत 5615 व ट्वेंटी-20त 1605 धावा केल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English