खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला मालामाल केले. कोलकाता नाइट रायडर्सनं त्याच्यासाठी 15.50 कोटी रक्कम मोजली. आयपीएल लिलावात 62 खेळाडूंवर बोली लागली. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली. एवढा पैसा ओतून एखाद्या फ्रँचायझीला काय नफा मिळत असेल, हा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेलच. चला तर मग या गुंतवणुकीमागचं अर्थकारण जाणून घेऊया...

मीडिया राईट्स - इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्याच्या प्रक्षेपणाचे मालकी हक्क विकून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बक्कळ पैसा कमावते. थेट प्रक्षेपण करणारी वाहिनी, ऑनलाईन प्रक्षेपणाचे हक्क, सोशल मीडिया आदींमधून मिळणाऱ्या मिळकतीतून काही रक्कम आपल्याकडे ठेवून बीसीसीआय प्रत्येक संघांचे शेअर त्यांना देते. स्पर्धा संपेपर्यंत संघाची कामगिरी कशी होते, त्यावर या शेअरची विभागणी केली जाते. त्यानुसार मीडिया राईट्समधून मिळालेला 60 ते 70 टक्के हिस्सा हा संघांमध्ये वाटला जातो.

ब्रँड स्पॉन्सरशीप - आयपीएलमधील फ्रँचायझी ब्रँड स्पॉन्सरशीपमधूनही खोऱ्यानं पैसा कमावतात. संघाच्या जर्सीवर ब्रँडचा लोगो कोणत्या ठिकाणी दिसेल, याच्यानुसार पैसा दिला जातो. ज्या ब्रँडचं नाव जर्सीवर ठळकपणे दर्शविले जाते, त्याच्याकडून फ्रँचायझी अधिक रक्कम घेते. शिवाय स्पॉन्सर त्या संघातील खेळाडूंसोबत काही इव्हेंटही आयोजित करतात आणि त्यामाध्यमातून ब्रँडचं प्रमोशनही होतं. यानुसार 20 ते 30 टक्के महसूल ब्रँड स्पॉन्सरशीपमधून मिळतो.

तिकिटांची विक्री - घरच्या मैदानावर होणाऱ्या प्रत्येक सामन्यांच्या तिकिटांचा महसूल हा त्या त्या फ्रँचायझींना मिळतो. त्यामुळे तिकिटांची किंमत फ्रँचायझी निश्चित करते. यातील बऱ्याच कमी तिकिटी या प्रायोजक आणि बीसीसीआयला दिल्या जातात. फ्रँचायझींना 80 टक्के तिकिटं मिळतात. त्यामुळे आयपीएल फ्रँचायझींना मिळणाऱ्या एकूण महसुलात 10 टक्के हा तिकीट विक्रितून येणारा असतो.

बक्षीस रक्कम - आयपीएलमधील बक्षीस रक्कम ही कोटींच्या घरात पोहोचली आहे. एकूण बक्षीस रक्कम ही फ्रँचायझी मालक आणि खेळाडू यांच्यात वाटली जाते. पण, बीसीसीआयच्या अटीनुसार किमान 50 टक्के बक्षीस रक्कम ही खेळाडूंना द्यायला हवी. पण, कोणत्या खेळाडूला किती हे फ्रँचायझी मालक ठरवतात.

टी-शर्ट, कॅप्स आणि वॉलेट - प्रत्येक फ्रँचायझींनी त्यांच्या चाहत्यांसाठी बाजारात विविध वस्तू विक्रीस आणल्या आहेत. त्या मार्फतही फ्रँचायझी प्रचंड महसूल कमावतात. हा आकडी बक्षीस रक्कमेपेक्षाही अधिक असतो.

बीसीसीआय सेंट्रल पूल - बीसीसीआयच्या अधिकृत प्रायोजकांकडून मिळणारा महसूल हा काही प्रमाणात फ्रँचायझींना दिला जातो. बीसीसीआयच्या सेंट्रल पूलनुसार प्रत्येक फ्रँचायझीच्या कामगिरीनुसार या महसूलाची विभागणी केली जाते.

स्टॉल - सामन्यादरम्यान केल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठीच्या करारातूनही फ्रँचायझींना काही हिस्सा मिळतो

खेळाडूंचं ट्रेडींग - आयपीएलच्या लिलावापूर्वी ट्रेड विंडो खुली केली जाते. यात प्रत्येक संघ खेळाडूंची अदलाबदल करून काही रक्कम कमवतात.