Happy Birthday Virat Kohli : भारतीय कर्णधाराचे अविश्वसनीय विक्रम, एका क्लिकवर

एका दशकात 20,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली हा जगातील एकमेव फलंदाज आहे. भारतीय कर्णधार कोहलीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर तिसऱ्या वन डे सामन्यात 99 चेंडूंत नाबाद 114 धावांची खेळी करून या विक्रमाला गवसणी घातली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतकी खेळी करून सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग या दिग्गजांना मागे टाकले. कोहलीच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 7 द्विशतकं आहेत आणि तेंडुलकर व सेहवागच्या नाववार 6 द्विशतकं..

विराट कोहली वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटनं 205 डावांत हा पराक्रम केला, तर सचिनला 259 डाव खेळावे लागले होते. 11,520 धावांसह भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा फलंदाज आहे.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. त्यानं 2017मध्ये तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 17 शतक ठोकली होती. रिकी पाँटिंग आणि ग्रॅमी स्मिथ यांनी कॅलेंडर वर्षात प्रत्येकी 9 शतकं झळकावली आहेत.

एकाच वर्षात आयसीसीचे तीनही वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा कोहली हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. कोहलीनं 2018मध्ये ICC Cricketer of the Year, ODI Cricketer of the Year आणि Test Cricketer of the Year हे तीन पुरस्कार जिंकले होते.

कसोटी कर्णधार म्हणून सर्वात जलद 4000 धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्यानं 65 डावांत हा पल्ला गाठून वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराचा ( 71 डाव) विक्रम मोडला.

वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. त्यानं महेंद्रसिंग धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांचा विक्रम मोडला. कोहलीनं 49 डावांत वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 3000 धावा चोपल्या.

कर्णधार म्हणून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा विक्रम विराटनं केला आहे. त्यानं 2017च्या कॅलेंडर वर्षात 1460 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं रिकी पाँटिंगचा ( 1424) 2007 सालचा विक्रम मोडला.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 43 शतकं आहेत आणि सचिन तेंडुलकरच्या शतकांशी बरोबरी करण्यासाठी त्याला 7 शतकांची गरज आहे.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा विराट हा पहिला भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गतवर्षी टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. 71 वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताला प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली.