टीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा!

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून येथे ते चार कसोटी, पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामने खेळणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुसरा कसोटी सामनाही येथेच होईल.

तिसरा व चौथा कसोटी सामना २४ फेब्रुवारी व ४ मार्च या तारखेपासून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र सामना असेल.

कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होईल, हे सामने अनुक्रमे १२, १४, १६, १८ व २० मार्चला अहमदाबाद येथेच होती. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल होतील. हे सामने २३, २६ व २८ मार्चला खेळवले जातील.

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. पण, या मालिकेपूर्वी टीम इंडिया विरुद्ध भारत अ असे दोन चार दिवसीय सराव सामने होणार आहेत. नॉर्थअॅम्पनशायर ग्राऊंडवर हे दोन सामने होतील.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी सराव म्हणून टीम इंडिया आणि भारत अ असे दोन सराव सामने होतील. त्यामुळे भारतातील सर्वच स्टार खेळाडूंचा एकमेकांविरुद्धचा सामना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे.

२१ ते २४ जुलै या कालावधीत पहिला, तर २८ ते ३१ जुलै या कालावधीत दुसरा सराव सामना खेळवण्यात येणार आहे.

असा असेल टीम इंडियाचा इंग्लंड दौरा - पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट , ट्रेंट ब्रिज, दुसरी कसोटी - १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स, तिसरी कसोटी - २५ ते २९ ऑगस्ट, हेडिंग्ले, चौथी कसोटी - २ ते ६ सप्टेंबर, ओव्हल, पाचवी कसोटी - १० ते १४ सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड

Read in English