आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020च्या मोसमाची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. या मोसमासाठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं सर्वाधिक भाव खाल्ला. त्यामुळे त्याची कामगिरी कशी होते, यासाठी चाहते आतूर झाले आहेत.

आयपीएलची गव्हर्निंग काऊंसिलची सोमवारी बैठक झाली आणि त्यात आयपीलचा पहिला सामना 29 मार्चला आणि अंतिम सामना 24 मे रोजी होईल, हे सांगण्यात आलं. त्याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच बदल पाहायला मिळतील.

यंदाच्या आयपीएलमध्ये रात्रीच्या सामन्यांची वेळ बदलून 8 एवजी 7.30 होईल अशी चर्चा होती, परंतु सामने 8 वाजताच खेळवले जातील हे स्पष्ट करण्यात आलं.

स्पर्धेचा कालावधी वाढल्यामुळे सायंकाळचे सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. पण, तसेही झाले नाही. यापूर्वीच्या आयपीएल मोसमांच्या तुलनेत यंदा केवळ पाच डबलहेडर सामने होणार आहेत.

आयपीएलमध्ये यंदा 'नो बॉल' लक्ष ठेवण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचाकडे सोपवण्यात येणार आहे. गतवर्षी याच नो बॉलच्या निर्णयामुळे बराच गदारोळ झाला होता. आता गोलंदाजाच्या पावलावर तिसऱ्या पंचाची नजर असणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) नव्या नियमाची अंमलबजावणी आयपीएलमध्येही होताना दिसेल. त्यानुसार सामन्यात दुखापत झालेल्या खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याची मुभा देण्यात येईल.

आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या तीन दिवसआधी आयपीएल ऑल स्टार्स यांच्यात एक सामना खेळवण्यात येणार आहे. त्याचं ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

राजस्थान रॉयल्सचे तीन सामने गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहेत. राजस्थान रॉयल्स संघानं तशी विनंती गव्हर्निंग काऊंसिलकडे केली होती.