"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित

Dinesh Karthik MS Dhoni Team India: धोनीच्या अवघ्या तीन महिने आधी दिनेश कार्तिकने केलं होतं क्रिकेटमध्ये पदार्पण

भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने टीम इंडियातील काही गुपिते चाहत्यांना सांगितली. महेंद्रसिंग धोनीने दिनेश कार्तिकला 'गिरगिट' म्हणजेच रंग बदलणारा सरडा बनण्यास भाग पाडले, असे कार्तिक म्हणाला.

कार्तिकने धोनीच्या तीन महिने आधी २००४ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते, परंतु धोनीच्या आगमनानंतर त्याला संघात स्थान मिळवणे खूप कठीण झाले. धोनीने कारकिर्दीची वादळी सुरुवात करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

लवकरच धोनी भारताचा आघाडीचा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आणि नंतर कर्णधारही बनला. धोनीने प्रदीर्घ काळ आपली संघातील जागा टिकवून ठेवली. पण आता दिनेश कार्तिकने त्याच्याबद्दल एक विधान केले आहे.

कार्तिक म्हणाला, "राहुल द्रविड त्यावेळी विकेटकीपिंग करत होता, पण तो स्वतः म्हणाला होता की तो फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. तेव्हा संघाला कायमस्वरूपी विकेटकीपरची गरज होती."

"मला थोड्या काळासाठी संधी मिळाली, पण मुख्य किपरची भूमिका बहुतेक महेंद्रसिंग धोनीसाठीच बनवण्यात आली होती. कारण तो संघामध्ये आला आणि सर्वकाही बदलले."

"धोनीच्या यशानंतर मला संघात बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. मी सरड्याप्रमाणे अनेक भूमिका बदलून खेळाशी जुळवून घेतले. सलामीवीरासाठी जागा मिळाली तेव्हा तामिळनाडूसाठी सलामीवीर झालो."

"जेव्हा मधल्या फळीत गरज होती, तेव्हा तिथे फलंदाजी केली. पण खरे आव्हान संघातील स्थान मिळवण्यापेक्षा ते कायम राखण्याचे होते. अनेक वेळा मी त्या दबावामुळे सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही."

"कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत मी ६ आणि ७व्या क्रमांकावर फलंदाजी केली, जे सोपे नव्हते, परंतु मी ते स्वीकारले. धोनीने मला खूप काही शिकवले. लवचिकता, धैर्य आणि संयम हे मी त्याच्याकडून शिकलो. "