Team India WTC Plan : दोन टप्प्यांत १८ दिवसांचे क्वारंटाईन, खेळाडूंसह कुटुंबीयांनाही प्रवासाला परवानगी

BCCI's WTC plan: families allowed to travel with players भारतीय खेळाडूंनी आता त्यांचा मोर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवला आहे.

भारतीय खेळाडूंनी आता त्यांचा मोर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवला आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा १४वा मोसम स्थगित करावा लागल्यानंतर आता भारतीय चाहत्यांना १८ जूनपर्यंत क्रिकेट सामन्यांची प्रतीक्षा पाहावी लागेल.

भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लवकरच लंडनला रवाना होणार आहे.

बीसीसीआयनं या चार महिन्यांच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी संघाची घोषणा केली. २५ मे पासून हे सर्व खेळाडू बायो बबलमध्ये दाखल होतील. भारतात हे खेळाडू ८ दिवसांच्या बायो बबलमध्ये राहतील आणि त्यानंतर लंडनमध्ये १० दिवासाचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतील.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं ANI ला सांगितले की, WTC फायनल आणि पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया लंडनसाठी २ जूनला रवाना होईल. त्यामुळे आम्ही क्वारंटाईन कालावधीचे दोन टप्प्यात विभागणी केली आहे. २५ मे ला खेळाडू बायो बबलमध्ये दाखल होतील, त्यानंतर ८ दिवसांचा क्वारंटाईन कालावधीपूर्ण करतील. त्यात त्यांची कोरोना चाचणी केली जाईल.

२ जूनला लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. पण, या क्वारंटाईन कालावधीत खेळाडू सराव करू शकतील. कारण, ते भारतातून एका बायो बबलमधून थेट लंडनमध्ये चार्टर्ड प्लेननं जाणार आहेत. तेथीही त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, असेही अधिकाऱ्यानं सांगितले.

भारतीय संघाचा हा दौरा १४ सप्टेंबरला संपुष्टात येईल. जवळपास ४ महिने खेळाडू लंडनमध्ये असणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबीयांनाही दौऱ्यावर जाण्यास परवानगी दिली गेली आहे.

''जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल आणि इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी यात एक महिन्याचा कालावधी आहे. पण, खेळाडूंना कोरोना नियमांचं पालन करावंच लागेल, त्यांना भटकंतीला कुठेही जाता येणार नाही. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयाना सोबत घेऊन जाता येणार आहे,''असेही त्यांनी सांगितले.

''भारत सरकारनं १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे खेळाडूही कोरोना लसीचा पहिला डोस घेतली. परंतु, दुसरा डोस कसा घेता येईल, हा प्रश्न बीसीसीआयला सतावत आहे आणि त्यावर काम सुरू आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं भारतीय खेळाडूंना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळेल, अशी खात्री दिली आहे. पण, त्यासाठी लंडन सरकारच्या परवानगीची गरज आहे,''असेही अधिकाऱ्यानं सांगितले.

बीसीसीआयनं शुक्रवारी २० सदस्यीय ( दोघांचा तंदुरुस्ती अहवाल येणे बाकी) संघ जाहीर केला. त्याशिवाय चार राखीव खेळाडूंचाही समावेश आहे.

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव. लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला