भारताला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देणारे 15 महारथी; नऊ वर्षांनंतर कोण काय करतंय पाहा!

02 एप्रिल 2011 ही भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत महत्त्वाची तारीख... वानखेडे स्टेडियमवरील त्या सामन्यानं कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या त्या षटकारानंतर भारतातील प्रत्येक जण आनंदाने नाचला होता... भारतीय संघानं तब्बत 28 वर्षांनंतर वन डे वर्ल्ड कप उंचावला तो याच दिवशी.

वर्ल्ड कप स्पर्धेतील साधारण कामगिरीमुळे युसूफ पठाणची कारकीर्दही उतरंडीला आली. 2012नंतर त्यानं आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

पीयूष चावलाने 2011च्या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळला नाही. पण, तो सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे.

मुनाफ पटेलनं 2011च्या वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. 2017पर्यंत तो स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय होता. 2018मध्ये त्यानं निवृत्ती जाहीर केली.

वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना हा एस श्रीशांतचा अखेरचा वन डे सामना ठरला. 2013मध्ये आयपीएल फिक्सिंग प्रकरणात तो अडकला आणि त्यानंतर तो संघात कमबॅक करू शकला नाही. सध्या तो अभिनय क्षेत्रात उतरला आहे.

सुरेश रैनानं वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुफानी खेळी केली होती. 2018नंतर तो टीम इंडियातून बाहेरच आहे. पण, आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो.

2011च्या वर्ल्ड कपमध्ये झहीर खाननं सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं 2016-17मध्ये इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर त्यानं आयपीएलमधून निवृत्ती घेतली. आता तो मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिके ऑपरेशन आहे.

हरभजन सिंगने वर्ल्ड कप स्पर्धेत 9 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या. आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहल यांच्या आगमनानं भज्जी टीम इंडियातून बाहेरच पडला. 2016पासून तो संघाबाहेरच आहे. तो सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.

2011च्या वर्ल्ड कपनंतर आर अश्विन दीर्घ काळ टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटमधील प्रमुख गोलंदाज होता. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याचा फॉर्म घसरला. 30 जून 2017नंतर तो एकही वन डे सामना खेळलेला नाही. तो कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे.

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं अंतिम सामन्यात विजयी षटकार खेचला होता. 2016मध्ये त्यानं संघाचे कर्णधारपद सोडले. गतवर्षी त्यानं कारकिर्दीतील चौथा वर्ल्ड कप खेळला आणि त्यानंतर तो मैदानाबाहेरच आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून त्याला टीम इंडियात कमबॅक करण्याची संधी होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट आहे.

भारताच्या वर्ल्ड कप विजयात युवराज सिंगचा महत्त्वाचा वाटा होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात त्यानं दमदार कामगिरी केली. कॅन्सरशी झगडत असतानाही त्यानं टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. गतवर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या तो परदेशातील लीगमध्ये खेळतो.

विराट कोहलीनं त्या वर्ल्ड कपमध्ये 9 सामन्यांत 282 धावा केल्या होत्या आणि त्यात एक शतकही होतं. सध्या विराट हा भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजही आहे. त्यानं आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत आणि तीनही फॉरमॅटमध्ये त्याच्या धावांची सरासरी ही 50च्या वर आहे.

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून गौतम गंभीरनं भारताच्या विजयाचा पाया रचला होता. 2018मध्ये त्यानं क्रिकेटमधून निवृत्ती घेताना राजकारणात प्रवेश केला. त्यानं पूर्व दिल्लीतून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

सचिन तेंडुलकरनं वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक 482 धावा केल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2013मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाचा मेंटर आहे. त्यानं नुकतीच क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे.

2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वीरेंद्र सेहवागला सलामीची जबाबदारी मिळाली होती. त्यानं 8 सामन्यांत 47.50च्या सरासरीनं 380 धावा केल्या होत्या. त्यात बांगलादेशविरुद्ध 175च्या खेळीचा समावेश होता. 20 ऑक्टोबर 2015मध्ये वीरूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचन करतो.

आशीष नेहराला वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नाही. 2017मध्ये त्यानं निवृत्ती जाहीर केली.