Budget 2024: मोदी सरकार ९००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार? PM Kisan वर मेन फोकस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 09:08 AM2024-01-30T09:08:21+5:302024-01-30T09:28:40+5:30

मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पातून अनेक क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अखेरचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पातून अनेक क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पातून या अपेक्षा पूर्ण होतात का हे पाहावं लागेल.

भारतातील शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून हमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojna) मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी देशातील शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. सरकार यावेळी बजेटमध्ये ही रक्कम वाढवू शकते.

सध्या या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात ६,००० रुपये मिळतात. सरकार बजेटमध्ये ही रक्कम ६,००० रुपयांवरून ९,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पीएम किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या पैशात थेट ५० टक्के वाढ करू शकते.

सध्या, लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एका हप्त्यात रुपये २,००० आणि वार्षिक ६,००० रुपये मिळतात. हे पैसे सरकार तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करते. प्रत्येक वेळी सरकार बँक खात्यात २,००० रुपये ट्रान्सफर करते. हा हप्ता दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येतो.

अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम ९००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. म्हणजेच शेतकऱ्यांचे पैसे थेट ६००० रुपयांवरून ९००० रुपयांपर्यंत वाढतील. सरकार त्यात थेट ५० टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. यापूर्वी असं वृत्त होतं की सरकार ८००० रुपयांपर्यंत रक्कम वाढवणार आहे, परंतु जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर सरकार पीएम किसानची रक्कम ५० टक्क्यांनी वाढवून ९००० रुपये करेल.

पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे. २०१९ च्या अंतरिम अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती. या सरकारी योजनेचा १६ वा हप्ता या वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान जारी होण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच, सरकारनं १५ नोव्हेंबरला १५ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असेल. या कारणास्तव, संपूर्ण वर्षाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. अंतरिम अर्थसंकल्प निवडणुकीच्या वर्षात सादर केला जातो. निवडणुकीनंतर स्थापन झालेलं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करतं.