भंडाऱ्यात शासकीय रुग्णालयात आग, १० बालकांचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं जाणून घ्या!

By मुकेश चव्हाण | Published: January 9, 2021 08:30 AM2021-01-09T08:30:10+5:302021-01-09T09:49:09+5:30

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजता ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे.

मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं.

लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं.

त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय.

याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

तसेच ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत गुदमरून मृत्यू झालेल्या बालकांचं पोस्ट मार्टेम करणार नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे घटनेमागचं कारण शोधून घटनेतील दोषींवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य राज्यमंत्री येड्रावर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.

रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते दाखल. रुग्णालयाला पोलिसांचा वेढा असून आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटे ५.३५ वाजता दाखल झाले आहेत.