Jyeshtha Gauri Avahana 2025: गौरी आवाहन पासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:47 IST2025-08-30T14:37:54+5:302025-08-30T14:47:46+5:30
Gauri Avahan Pujan 2025, Gauri Avahan Muhurat, Gauri Puja Samagri, Gauri Ganpati 2025, Gauri Avahan Rituals,: भाद्रपद महिन्यातील गणपतीच्या उत्सवाबरोबरच भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा (लक्ष्मीचा) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या उत्सवाची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. सर्वसाधारणपणे तीन टप्प्यात गौरी पूजन होते. याबाबत शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेऊ.

Gauri Avahan 2025 Puja Vidhi, Muhurat, Rituals,
गौरी आगमन(Gauri Avahan 2025), गौरी पूजन (Gauri Puja 2023) आणि गौरी विसर्जन(Gauri Visarjan 2025) हे गौरी पूजेचे मुख्य तीन टप्पे असतात. यंदा ३१ ऑगस्ट रोजी गौराईला आपण घरी आवाहनकरणार आहोत, १ सप्टेंबर तिची स्थापना, पूजन आणि नैवेद्य होईल आणि २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल.
गौरी पूजनाच्या पद्धती आणि नैवेद्य :
गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही जण चांदीच्या, पितळेच्या व मातीच्या मुखवट्यावर, काही जणी सुघटावर, काही जणी मूर्तीवर तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात. हळदकुंकू, आघाडा, दूर्वा, फुले, कापसाची वस्त्रे अर्पण करतात. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरण, खीर, तर तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवले, दहीभात असा नैवेद्य करतात. इतरही स्वयंपाक असतोच.
गौरी आवाहन :
गौरी आवाहनाचा दिवशी घराच्या उंबऱ्यातून गौरी आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे.
गौरीपूजन
दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. गौरींची पूजा-आरती करून केलेल्या दिवाळीत करतो तशा फराळाचा नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळीसह सोळा भाज्यांचा समावेश असतो. त्याबरोबरच कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ करतात. त्यादिवशी हळदी कुंकू तसेच काही ठिकाणी कुमारिका पूजनही केले जाते.
विसर्जन
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यामध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.
सवाष्ण जेवण :
दुसऱ्या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवू घालतात. तिला विडा व दक्षिणा देतात. दुपारी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावतात. तिसऱ्या दिवशी गौरीवर हळद कुंकू वाहून, अक्षता टाकून तिचे यथाविधी विसर्जन करतात. गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी, फुगड्या व खेळ करून देवीसाठी जागरण करतात.
ज्येष्ठागौरीची उत्सव साजरा करण्यामागची कथा :
एके काळी उन्मत्त राक्षसांकडून देवांसहित सर्व लोकांना खूपच त्रास होऊ लागला. तेव्हा सर्व स्त्रिया देवांसहित महालक्ष्मीस शरण गेल्या. तिची पूजा, प्रार्थना करून `आम्हाला दैत्यांच्या जाचातून मुक्त कर. आमच्या सौभाग्याचे रक्षण कर; अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या महालक्ष्मीने आपल्या प्रखर शक्तीने आणि अतुलनीय शौर्याने दुष्ट राक्षसांचा वध करून जनतेला दिलासा दिला. या कृतज्ञतेची जाणीव म्हणून महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.
गौरी विधी मुहूर्त :
गौरी आगमन : ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:२५ वाजेपर्यंत , गौरी पूजन : १ सप्टेंबर रोजी सकाळी ५:५९ वाजल्यापासून संध्याकाळी ६:४३ वाजेपर्यंत, गौरी विसर्जन : २ सप्टेंबर रोजी रात्री ९:५० मिनिटांपर्यंत