निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्या! परभणी मनपात एका मताने पराभव झालेल्या उमेदवाराची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:18 IST2026-01-27T19:17:15+5:302026-01-27T19:18:54+5:30
एका मताने झालेला विजय आणि एका मताने झालेला पराभव या दोन्ही बाबींमुळे राज्यभर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.

निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्या! परभणी मनपात एका मताने पराभव झालेल्या उमेदवाराची कोर्टात धाव
- राजन मंगरुळकर
परभणी : महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग एक अ मधील दोन उमेदवारातील लढत ही अटीतटीची ठरली होती. केवळ एका मताने विजयी झालेल्या उद्धव सेनेच्या नगरसेवकाच्या विजयाविरोधात पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवाराने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पुन्हा निवडणूक प्रक्रिया घेण्याची मागणी केल्याचे प्रसाद नागरे यांनी स्पष्ट केले.
शहरातील प्रभाग क्रमांक एक अ मधील निवडणूक रिंगणात उद्धव सेनेकडून व्यंकट डहाळे आणि भाजपकडून प्रसाद उर्फ बबलू नागरे हे होते. यामध्ये उद्धव सेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे हे एका मताने विजयी झाले होते. या निकालावरून काही वेळ गोंधळ सुरू होता. सर्व बाजू तपासल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यंकट डहाळे यांचा एका मताने विजय झाल्याचे जाहीर केले होते.
पराभूत उमेदवार प्रसाद नागरे यांनी या निर्णयाविरोधात अखेर कोर्टात धाव घेतली आहे. सोबतच त्यांनी पोस्टल मतदान प्रक्रियेतील गंभीर बाबी निवडणूक आयोगासह न्यायालयास तक्रार आणि याचिकेद्वारे निदर्शनास आणून दिल्या. तर त्यांच्यासोबत प्रभाग एक ड मधील भाजपचे पराभूत उमेदवार दत्तराव रेंगे यांनी सुद्धा काही मतदान बूथ आणि निवडणूक निकालपत्रातील मतांच्या बाबी संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. एका मताने झालेला विजय आणि एका मताने झालेला पराभव या दोन्ही बाबींमुळे राज्यभर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.