राजेश विटेकरांचे धाडस कामी आले, विधान परिषदेवर असताना विधानसभा लढले अन् जिंकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:29 IST2024-11-28T13:29:24+5:302024-11-28T13:29:56+5:30
२०१९ ला राजेश विटेकर यांनी थेट लोकसभा लढविली पण पदरी अपयश, त्यानंतर पहिल्यांदा विधानसभा लढवत जिंकले

राजेश विटेकरांचे धाडस कामी आले, विधान परिषदेवर असताना विधानसभा लढले अन् जिंकले
परभणी : विधान परिषदेवर निवडून येण्याला अवघ्या तीन महिन्यांचा काळ लोटला असतानाच आ. राजेश विटेकर यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढली अन् ती जिंकली. २०१९ला त्यांनी थेट लोकसभा लढविली होती. पदरी अपयश आल्याने यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करून त्यांनी विधानसभेचे मैदान मारले.
पाथरी हा मागील १५ वर्षांत कायम दोन आमदार राहणारा मतदारसंघ. एक विधानसभेवर तर दुसरा विधान परिषदेवर राहत आला. मोहन फड निवडून आले तेव्हा विधान परिषदेवर बाबाजानी दुर्राणी हे आधीपासूनच होते. तर सुरेश वरपूडकर हे विधानसभेवर असल्याच्या आधीच बाबाजानी विधान परिषदेवर होते. त्यामुळे या मतदारसंघात आता राजेश विटेकर हे विधान परिषदेवर गेल्याने पुन्हा दोन आमदारांची ही परंपरा मतदार कायम ठेवतील, अशी आवई उठली होती. विरोधकांनीही प्रचारात हाच मुद्दा ठेवत विटेकर निवडून आले तर पाथरीतील दोन आमदारांची परंपरा खंडित होण्याची भीती दाखविली होती.
विटेकर यांना २०१९ मध्ये लोकसभेला पराभव पत्करावा लागला. २०२४ मध्ये महादेव जानकर यांच्यासाठी त्याग करावा लागला. त्यामुळे विधानपरिषद मिळाली असली तरीही भविष्यात सुरक्षित मतदारसंघ तर हवा असल्याने त्यांनी ही निवडणूक लढविली.
धाडस कामी आले
आ. राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने आधी उमेदवारी घोषित केली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने स्वत: विटेकर यांनाच मैदानात उतरवले. विटेकरांनी सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून स्वत:चा अर्ज कायम ठेवला. हे धाडस कामी आले आणि ते विजयी झाले.
आता मिळाला हक्काचा मतदारसंघ
स्थानिक राजकीय तडजोडीत दिग्गज नेतेमंडळी आ. राजेश विटेकरांना संधी मिळू नये, यासाठी कायम आतून एकत्र यायचे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर मात करण्यासाठी त्यांना लोकसभेच्या भव्य मैदानात पकड जमविताना अडचणी यायच्या. पाथरी विधानसभेत मित्रपक्षाच्या छायेखाली राहावे लागत होते. अजित पवार गटात प्रवेश करत त्यांनी या सर्व अडचणी आधीच दूर केल्या. सुरेश वरपूडकर, बाबाजानी दुर्राणी या दोन माजी आमदारांसह माजी आमदार मोहन फड यांचे वडील मैदानात असताना त्यांनी बाजी मारली. आता त्यांना हक्काचा मतदारसंघ मिळाला आहे.