'मनपा'साठी आश्वासनांची खैरात; विश्वास ठेवायचा तरी कोणत्या पक्षावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:16 IST2026-01-13T15:16:32+5:302026-01-13T15:16:52+5:30

नेत्यांच्या रोज होताहेत सभा; सगळ्या पक्षांकडून वाचला जातोय त्याच समस्यांचा पाढा

Prabhani Municipal Election 2026 promises from all parties; Which party should be trusted? | 'मनपा'साठी आश्वासनांची खैरात; विश्वास ठेवायचा तरी कोणत्या पक्षावर...

'मनपा'साठी आश्वासनांची खैरात; विश्वास ठेवायचा तरी कोणत्या पक्षावर...

परभणी: महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी नेत्यांच्या रोज सभा होत आहेत. कोणी प्रभाग दत्तक घेत आहे तर कोणी शहरच. कोणी विकासाची जबाबदारी घेत आहे तर कोणी कोट्यवधींच्या निधीतून विकासाची स्वप्ने दाखवत आहे. मात्र, मूलभूत समस्या पूर्ण होण्यासाठी झुरणाऱ्या या शहराला कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न पडला आहे. शिवाय काही ठिकाणी तर या घोषणांवर स्थानिक अथवा प्रभागातील नेतृत्वच भारी पडताना दिसत आहे.

मनपा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील समस्यांचा ऊहापोह होत आहे. त्यावर उपायही नेतेमंडळी, नगरसेवकपदाचे उमेदवार शोधत आहेत. मात्र, यातील अनेक समस्या वर्षानुवर्षे कायम असून प्रत्येक निवडणुकीत तीच आश्वासने देऊन उमेदवारही थकत नाहीत. यावेळी पुन्हा त्याच आश्वासनांच्या घोषणा ऐकून मतदारांचेही कान पिकले आहेत.

यावेळी तर नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या सुरात सूर मिसळत नेतेही तोच राग आळवत आहेत. ज्या शहरात आतापर्यंत मूलभूत सुविधाच निर्माण होऊ शकल्या नाहीत, तेथे कोट्यवधींच्या निधीची उड्डाणे घेणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न मतदारांना पडला.

म्हणे, सत्ता दिली तरच विकास सत्ता दिली तरच विकास हे एक नवे सूत्र पुढाऱ्यांच्या भाषणांतून समोर येत आहे. ही एकप्रकारे मतदारांना धमकीच असली तरीही मतदार मात्र तिला भीक घालतील, असे चित्र नाही. त्यातही परभणीच्या सोशिक जनतेवर याचा तीळमात्र फरक पडेल, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे झेपेल तीच आश्वासने देऊन मतदारांना उगीच दिवास्वप्ने दाखवणे बंद होण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या पक्षाला विकासाची एवढीच चिंता आहे तर सत्ता मिळाली किंवा नाही मिळाली तरीही ही कामे करता येणार नाहीत का? मग या वल्गना कशासाठी? असा प्रश्नही मतदारांना पडला आहे.

आणखी किती आश्वासने देणार?
स्वच्छता, उद्यान विकास, पाणीपुरवठा या मूलभूत समस्यांचीच आश्वासने अनेक भागांत द्यावी लागत आहेत. भुयारी गटार योजना पूर्ण झाल्याशिवाय यातील इतर अनेक आश्वासने पूर्ण करता येणेही शक्य नाही. भुयारी गटार व समांतर पाणीपुरवठा योजनाच सुधारित दराने मंजूर न झाल्यास तिला विरोध होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या सभागृहात हा मुद्दा हॉट राहणार आहे.

लक्ष्मीअस्त्राचे सुरू झाले नियोजन
पुढचे दोन दिवस आता रात्र वैन्ऱ्याची समजून उमेदवार व समर्थकांना जागून काढावे लागणार आहेत. ज्यांचे पारडे जड दिसत नाही, त्यांनी आता लक्ष्मीअस्त्राची तयारी सुरू केली आहे. कोणत्या भागावर फोकस करायचा, याचाही इरादा पक्का झाल्याचे दिसत आहे. वात वर्षानुवर्षे अनुभय असलेले मात्र निश्चिंत असून नय्यांनाच या नियोजनाची घाई दिसत आहे.

Web Title : परभणी नगर पालिका चुनाव: वादों की भरमार, किस पार्टी पर करें विश्वास?

Web Summary : परभणी नगर पालिका चुनावों में नेताओं द्वारा विकास के परिचित वादे किए जाने पर मतदाता संशय में हैं। वर्षों से बुनियादी ज़रूरतें पूरी नहीं होने के कारण, मतदाता भव्य प्रतिज्ञाओं की विश्वसनीयता पर सवाल उठाते हैं और सोचते हैं कि आश्वासनों की झड़ी के बीच किस पार्टी पर वास्तव में भरोसा किया जाए।

Web Title : Parbhani Municipal Elections: Empty Promises Galore, Which Party to Trust?

Web Summary : Parbhani voters are skeptical as leaders offer familiar promises of development during municipal elections. With basic needs unmet for years, voters question the credibility of grand pledges and wonder which party truly deserves their trust amidst a flurry of assurances.