परभणी मनपाचे सर्वसाधारणला महापौरपद सुटल्याने उद्धवसेना व काँग्रेसचे इच्छुक वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 20:07 IST2026-01-23T20:07:02+5:302026-01-23T20:07:44+5:30

परभणी महापालिकेत उद्धवसेना व काँग्रेस आघाडीला ३७ जागा मिळाल्या. यातील २५ उद्धवसेनेच्या तर १२ काँग्रेसच्या आहेत.

Parbhani Municipal Corporation Mayor 2026: As the post of Mayor of Parbhani Municipal Corporation is vacant, the number of candidates from Uddhav Sena and Congress will increase. | परभणी मनपाचे सर्वसाधारणला महापौरपद सुटल्याने उद्धवसेना व काँग्रेसचे इच्छुक वाढणार

परभणी मनपाचे सर्वसाधारणला महापौरपद सुटल्याने उद्धवसेना व काँग्रेसचे इच्छुक वाढणार

परभणी : महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारणला सुटल्याने या पदावर कोणीही बसू शकतो. यामुळे उद्धवसेना व काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली असून संख्याबळाने उद्धवसेना पुढे असली तरीही काँग्रेसच्या काहींनाही आता या पदाची अपेक्षा लागली आहे.

परभणी महापालिकेत उद्धवसेना व काँग्रेस आघाडीला ३७ जागा मिळाल्या. यातील २५ उद्धवसेनेच्या तर १२ काँग्रेसच्या आहेत. जास्त जागा जिंकल्याने उद्धवसेना या पदावर आधीपासूनच दावा करीत आहे. तसे निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्धवसेनेचाच महापौर होणार असा प्रचार करूनच त्यांनी निवडणुका जिंकल्या. मात्र काँग्रेसनेही मध्येच या पदावर दावा करीत मागच्यावेळी आमची सत्ता असल्याने यात पहिली संधी आम्हाला मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

आरक्षणाचे काहीच खरे नसल्याने दोन्ही पक्षातील स्थानिक नेतेमंडळी मात्र शांत होती. आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर या हालचालींना वेग येणार आहे. उद्धवसेनेत आ. राहुल पाटील व खा. संजय जाधव यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. तर काँग्रेसमध्ये माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ. बाबाजानी दुर्राणी, माजी खा. तुकाराम रेंगे, भगवान वाघमारे, नदीम इनामदार, सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदींची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. काँग्रेसने तर महापौर पदाच्या बोलणीसाठी समितीच नेमली आहे.

अनेकांची नावे आहेत चर्चेत
उद्धवसेनेकडून निवडून आलेल्यांमध्ये अनेक नवे चेहरे आहेत. काहीजण यापूर्वी इतर पक्षात होते, त्यांना अनुभव असला तरीही ते उद्धवसेनेत नवीन आहेत. त्यामुळे आता उद्धवसेना महापौर पदाचा उमेदवार ठरविताना काय निकष लावते, त्यावर सगळी गणिते आहेत. चर्चेतील नावांची संख्या वाढत चालली असून चार ते पाच नावे आता चर्चेत येत आहेत. सय्यद इकबाल, दिलीप ठाकूर, प्रतिभा सरोदे, माजू लाला अशी अनेक नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून गणेश देशमुख, भगवान वाघमारे यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.

काँग्रेसने नोंदवला होता आक्षेप
मुंबईत आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू असताना परभणीत दोनवेळा महिलेला आरक्षण सुटले होते, असा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र परभणीत सर्वसाधारणला महापौर पद सुटल्याने महिला आरक्षणावर घेण्यात आलेल्या या आक्षेपाचा काही फायदा झाल्याचे दिसत नाही. परभणीतून अनेकजण महापौर आरक्षण सोडतीसाठी मुंबईत गेले होत. सर्वसाधारणला हे पद सुटल्याने आता चुरस वाढणार आहे.

Web Title: Parbhani Municipal Corporation Mayor 2026: As the post of Mayor of Parbhani Municipal Corporation is vacant, the number of candidates from Uddhav Sena and Congress will increase.