परभणी मनपाच्या महापौरपदासाठी उद्धवसेनेच्या पाच जणांचे नामनिर्देशन दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:32 IST2026-02-03T12:30:39+5:302026-02-03T12:32:25+5:30
अर्ज सादर करण्यासाठी आजचा दिवस, उपमहापौर पदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.

परभणी मनपाच्या महापौरपदासाठी उद्धवसेनेच्या पाच जणांचे नामनिर्देशन दाखल
- राजन मंगरूळकर
परभणी : महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी मंगळवार हा दिवस निश्चित केला आहे. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत महापौर पदासाठी उद्धव सेनेच्या वतीने एकूण पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. उपमहापौर पदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.
परभणी महापालिकेच्या एकूण ६५ जागांपैकी उद्धव सेनेला २५, काँग्रेस १२, भाजप १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ११, जनसुराज्य शक्ती ३, यशवंत सेना १, अपक्ष १ असे संख्याबळ पक्षनिहाय आहे. यामध्ये उद्धवसेना आणि काँग्रेस यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापौर पदासाठी उद्धवसेना तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून अर्ज भरले जाणार आहेत.
मंगळवारी प्राप्त अर्ज
उद्धवसेनेकडून गटनेते दिलीप सिंह ठाकुर, माजी उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान, नगरसेवक श्याम खोबे, सय्यद इकबाल, शरफुद्दीन सिद्दिकी यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशक पत्र दाखल केले आहेत.
राष्ट्रवादी, भाजप यांच्याकडून दुपारी अर्ज सादर होणार
महापौर पदासाठी उद्धव सेनेने पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अद्याप उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेदवार दाखल झाले नाहीत. तर राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही सदस्यांनी अर्ज खरेदी केली आहे. त्याच्याकडून दुपारी दोन वाजेनंतर अर्ज भरले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या निवडणुकीच्या लढतीचे अंतिम चित्र सायंकाळी सहा वाजता अर्ज सादरीकरणानंतर स्पष्ट होणार आहे.