परभणीत खासदार, आमदारांचे मनोमिलन अन् महाविकास आघाडीचे दरवाजेही उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:45 IST2025-12-27T16:40:16+5:302025-12-27T16:45:02+5:30
अर्ज भरण्यापूर्वीच बदलतेय राजकीय वातावरण; छुप्या हालचालींनाही वेग

परभणीत खासदार, आमदारांचे मनोमिलन अन् महाविकास आघाडीचे दरवाजेही उघडले
परभणी : नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा झंझावात आल्याने आता महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील नेते सावध झाले असून, आघाडीच्या माध्यमातून लढण्यासाठी मनोमन प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच खा. संजय जाधव व आ. राहुल पाटील यांचे मनोमिलन झाल्याने आघाडी होण्यासाठी दरवाजे खुले झाले आहेत.
परभणी शहरात मागील दीड दशकात राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसनेच सत्तेचे समीकरण जुळविण्यात यश मिळविलेले आहे. उद्धवसेनेचे खा. संजय जाधव व आ. डॉ. राहुल पाटील हे तेव्हाही सक्रिय असले, तरीही सत्तेपर्यंत ते कधीच पोहोचू शकले नव्हते. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तर २०१७ मध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. माजी आ. सुरेश वरपूडकर यांनी जुळविलेल्या गणितांमुळे ते शक्य झाले होते. मात्र, आता वरपूडकर भाजपमध्ये आहेत. शिवाय पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर या त्यांच्यासोबत आहेत. शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदेसेना भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले, तर त्यांनाही मतविभाजनाचा फटका सोसावा लागू शकतो. राष्ट्रवादी (अजित पवार) यांची तयारी स्वबळाच्या दिशेनेच आहे. शिवाय आ. रत्नाकर गुट्टे यांनी स्थानिक आघाडीची घोषणा केली. त्यामुळे महायुतीतील भाजप व शिंदेसेना वगळता इतर सर्वांनीच वेगळी चूल मांडली आहे.
या परिस्थितीत टिकाव धरायचा, तर महाविकास आघाडी म्हणून लढल्यास काँग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिका निकालानंतर महाविकास आघाडीतील मंडळी आता या पर्यायावर विचार करताना दिसत आहे. काही जागा मोठ्या तर काही किरकोळ फरकाने गमवाव्या लागल्याने त्यांना याची जाणीव होताना दिसत आहे. उद्धवसेनेने माजी उपमहापौर माजूलाला, समाजसेवक सय्यद कादर यांना मंचावर आणून आमच्याकडेही मुस्लीम चेहरे असल्याचे दाखवून दिल्याचे दिसत आहे.
इच्छुक सगळ्यांकडेच वाढले
काँग्रेस मागच्यावेळी सत्तेत असल्याने १७५ पेक्षा जास्त इच्छुक आहेत. तर, उद्धवसेनेच्या मुलाखती संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर घेत आहेत. त्यांच्याकडेही १८० जणांनी अर्ज केला. त्यामुळे भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार)च नव्हे, आघाडीतील पक्षांकडेही इच्छुकांची तेवढीच गर्दी दिसत आहे.
आणखी एका आघाडीचा प्रयत्न
भाजप नेते सुरेश वरपूडकर यांनी भाजपकडून मुस्लीम नगरसेवक निवडून येतील की नाही, याची शाश्वती नसल्याने आणखी एक आघाडी मैदानात उतरविण्याचे प्रयत्न चालविल्याचे ऐकायला मिळत आहे. आ. गुट्टे यांच्या आघाडीनंतर ही दुसरी आघाडी राहिल्यास मतविभाजनाचा हा नवा फॅक्टर तर नाही, अशी राजकीय चर्चा ऐकायला मिळत आहे.
माजी खासदाराचा मुलगा भाजपमध्ये
माजी खा. तुकाराम रेंगे हे काँग्रेसमध्येच असले, तरीही त्यांचा मुलगा दत्तराव रेंगे यांनी भाजप प्रवेश केल्याने काँग्रेसजनांच्या भुवया उंचावल्या आहेत. दत्तराव रेंगे आता त्या प्रभागात नगरसेवकपदासाठी काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख यांच्या मुलाविरुद्ध उभे राहतील, असा अंदाज आहे.