मानवत पालिकेत 'लाड' पर्व! नगराध्यक्ष पत्नी तर उपनगराध्यक्ष पती; राजकारणातील दुर्मिळ योग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:05 IST2026-01-12T12:01:42+5:302026-01-12T12:05:05+5:30
मानवतच्या सत्तेची सूत्रे आता पती-पत्नीच्या हाती; राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित

मानवत पालिकेत 'लाड' पर्व! नगराध्यक्ष पत्नी तर उपनगराध्यक्ष पती; राजकारणातील दुर्मिळ योग!
मानवत: मानवत नगरपालिकेच्या राजकीय पटलावर आज एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटनेची नोंद झाली. नगराध्यक्ष पदावर आधीच राणी लाड विराजमान असताना, आता उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचे पती डॉ. अंकुश लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात पती-पत्नीकडे एकाच वेळी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही पदे असण्याचे हे अत्यंत दुर्मीळ उदाहरण मानले जात आहे.
बिनविरोध निवडीने राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित
नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६ सदस्यांचे स्पष्ट बहुमत असल्याने डॉ. अंकुश लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, इतर पक्षांनी उमेदवारी न दिल्याने ही निवड बिनविरोध झाली. पालिकेच्या सभागृहात सध्या शिंदेसेनेचे ४, उद्धव सेनेचा १ आणि भाजपचा १ सदस्य असून, राष्ट्रवादीच्या ताकदीसमोर विरोधकांनी माघार घेतली.
"आता राजकारण नको, विकास करू"
निवडीनंतर डॉ. अंकुश लाड आणि नगराध्यक्षा राणी लाड यांनी जनतेचे आभार मानले. "निवडणूक होईपर्यंत राजकारण होते, आता ते संपले आहे. आमचे संपूर्ण लक्ष आता शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सर्वांगीण विकासावर असेल. सर्व सदस्यांना सोबत घेऊन आम्ही मानवतचा कायापालट करू," असा शब्द या दाम्पत्याने दिला आहे. या निवडीमुळे लाड समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.