गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:35 IST2025-10-01T14:34:54+5:302025-10-01T14:35:14+5:30
पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.

गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
गंगाखेड (जि. परभणी) - धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि दीपक बोराडे यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुधवारी (१ ऑक्टोबर) गंगाखेड शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान ओबीसी नेते सुरेश बंडगर यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
शहरातील महाराणा प्रताप चौक, परळी नाका येथे धनगर समाज बांधवांनी दुपारी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. १२:४५ वाजता आंदोलनाचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच सुरेश बंडगर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले व पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना तात्काळ ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
कोण आहेत सुरेश बंडगर?
सुरेश बंडगर गंगाखेडमधील ओबीसी नेते आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सलग २१ दिवसांचे आमरण उपोषण त्यांनी केले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. दरम्यान, आजच्या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांत तसेच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.