परभणीत युती फिसकटल्याने भाजप, शिंदेसेना सैरभैर; एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:12 IST2026-01-08T15:12:16+5:302026-01-08T15:12:38+5:30
राष्ट्रवादी (अ.प.), काँग्रेस-उद्धवसेना आघाडीचा संथ पण नियोजनबद्ध प्रचार

परभणीत युती फिसकटल्याने भाजप, शिंदेसेना सैरभैर; एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच व्यस्त
परभणी : महापालिका निवडणुकीत ऐनवेळी भाजप व शिंदेसेनेची युती फिसकटली. मात्र त्यानंतर प्रचारयंत्रणा राबवितानाही ती झलक अजून पहायला मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा तर घेतली. मात्र, अपेक्षित वातावरणनिर्मिती करू शकले नाही. युतीतील घटकपक्ष अजूनही एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच व्यस्त असताना काँग्रेस व उद्धवसेनेचा संथ पण नियोजनबद्ध प्रचार रंगत आणत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)ची मंडळीही इतर फंदात न पडता फक्त लक्ष्यभेद करण्यासाठी धडपडत आहे.
परभणी महापालिकेत मागच्या सभागृहात काँग्रेस ३१, राष्ट्रवादी १९, भाजप ८, शिवसेना ५, इतर २ असे चित्र होते. यावेळी महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी (अजित पवार) एकीकडे तर भाजप व शिंदेसेना दुसरीकडे असे चित्र होते. महायुतीतील घटक पक्षांतील ओढाताण पाहता महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगवेगळे लढतील असे सर्वांना वाटत होते. मात्र, काँग्रेस व उद्धवसेनेने आघाडी केली. मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने बॅकफूटवर येत उद्धवसेनेला जास्त उमेदवार लढण्याची संधी दिली. तर, महायुतीतील सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यातही राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट एकत्र लढत आहेत. मात्र, भाजप व शिंदेसेना एकत्र येऊ शकली नाही.
सध्या शहरात ज्या हिंदूबहुल प्रभागांवर भाजप व शिंदेसेनेचा डोळा होता, तेथे हे दोन्ही पक्ष बहुतेक प्रभागांत लढत आहेत. त्याचा फायदा होणार की तोटा? हे दोघांनाही माहिती आहे. मात्र, भाजप केंद्र व राज्यातील सत्तेचे दाखले देत विकासाचे स्वप्न दाखवत आहे, तर शिंदेसेना व दादांची राष्ट्रवादीही आम्ही काय सत्तेच्या बाहेर आहोत काय? असा सवाल करीत भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करीत आहे. शहरातील सामाजिक गणितांचा आधार घेत सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या काँग्रेस व उद्धवसेनेला संधीचे आवाहन करीत आहेत.
पराकोटीच्या विरोधातही सेटलमेंट कायम
महापालिका निवडणुकीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तरीही काही ठिकाणी सेटलमेंट राजकारणाचा प्रत्यय येत आहे. या ठरावीक प्रभागांची चर्चा होत आहे. आजी-माजी खासदार आमदारांनी कुठे प्रिय कार्यकर्ता तर कुठे नात्यागोत्यांसाठी केलेली ही सेटलमेंट मतदार मान्य करतात का? हा प्रश्न आहे.