एका मताची ताकद! परभणीत उद्धवसेनेच्या उमेदवाराचा १ मताने थरारक विजय, भाजपला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:38 IST2026-01-20T17:35:21+5:302026-01-20T17:38:30+5:30
समाज माध्यमावर एकच चर्चा ; एका मताची प्रभाग एक अ मधील लढत ठरली चुरशीची

एका मताची ताकद! परभणीत उद्धवसेनेच्या उमेदवाराचा १ मताने थरारक विजय, भाजपला धक्का
- राजन मंगरुळकर
परभणी: "निवडणुकीच्या दिवशी सुट्टी आहे, कशाला मतदान करायला जायचं? माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे?" असा प्रश्न विचारणाऱ्या मतदारांसाठी परभणी महानगरपालिकेचा निकाल हा डोळे उघडणारा ठरला आहे. प्रभाग क्रमांक १ 'अ' मधील लढतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे यांनी भाजपच्या प्रसाद नागरे यांचा अवघ्या 'एक' मताने पराभव केला आहे. या निकालाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर 'एका मताच्या ताकदी'ची चर्चा रंगली आहे.
अटीतटीची लढत अन् श्वास रोखणारी मतमोजणी
प्रभाग १ 'अ' मध्ये एकूण १० हजार १०१ वैध मते पडली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच व्यंकट डहाळे आणि प्रसाद नागरे यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. दोन्ही उमेदवारांचे समर्थक विजयाचा दावा करत होते. मात्र, जेव्हा अंतिम आकडेवारी समोर आली, तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. उद्धवसेनेचे व्यंकट डहाळे यांना ४,३१२ मते मिळाली, तर भाजपचे प्रसाद नागरे यांना ४,३११ मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने डहाळे हे विजयी घोषित झाले.
मतदारांना मिळाला मोठा धडा
अनेकदा मतदार 'एक मत काय करणार?' म्हणून मतदानाकडे पाठ फिरवतात. मात्र, या निकालाने सिद्ध केले आहे की, लोकशाहीत एक मत कोणाचे नशीब उजळवू शकते आणि कोणाला पराभवाच्या गर्तेत टाकू शकते. जर एका मतदाराने आळस झटकून मतदान केले असते किंवा एखाद्याने मत दिले नसते, तर निकाल पूर्णपणे वेगळा असता. या निकालामुळे सध्या परभणीत विजयाचा जल्लोष सुरू असला, तरी प्रसाद नागरे यांच्या समर्थकांमध्ये मात्र एका मताच्या निसटत्या पराभवामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.