उरणसह नवी मुंबईच्या सुरक्षेचे काय..?

By नारायण जाधव | Updated: May 12, 2025 03:07 IST2025-05-12T03:06:55+5:302025-05-12T03:07:20+5:30

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले.

what about the security of navi mumbai including uran | उरणसह नवी मुंबईच्या सुरक्षेचे काय..?

उरणसह नवी मुंबईच्या सुरक्षेचे काय..?

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले. यात राज्यातील अतिसंवेदनशील श्रेणी १ चे ठिकाण म्हणून उरण परिसराचा समावेश केला होता. कारण, उरणमध्ये केंद्र, राज्य आणि खासगी आणि नौदलाचे मोठे प्रकल्प आहेत. अटल सेतूनंतर नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. २६/११ नंतर देशात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत जरा काही झाले, तर उरण परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातात; परंतु कायमस्वरूपी तोडगा कोणी शोधत नाही.  

उरणचा समुद्रकिनारा दक्षिण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. उरणचा समुद्रकिनारा खोल असल्याने ८० च्या दशकात येथे देशातील सर्वांत मोठ्या  जवाहरलाल नेहरू बंदराची पायाभरणी केली. आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे. येथेच ‘ओएनजीसी’चा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. येथे जमीन आणि समुद्राखालून ऑइल आणि रसायनांच्या पाइपलाइन गेल्या आहेत. याच परिसरात बुचर आयलँडसह जगप्रसिद्ध एलिफंटाबेटावर ‘युनेस्को’चे वारसास्थळ असलेल्या घारापुरी लेणी आहेत. तेथे पर्यटकांचा ओघ असताे. मात्र, दोन पोलिस शिपाई वगळता ठोस बंदोबस्त आजही नेमलेला नाही.

नौदलाचा आयएनएस आंग्रे हा तळ उरणमध्येच आहे. नौदलाची जहाजे, पाणबुड्यांचा  शस्त्रसाठा येथेच ठेवला जातो.  
२६/११ च्या हल्ल्यानंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली होती. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले होते. या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा तैनात करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नौदलाने नोंदविले होते.

‘जेएनपीए’च्या ५०० हेक्टर केमिकल झोनमध्ये मोठमोठे अतिसंवेदनशील प्रकल्प आहेत. यात इंडियन ऑइल,  रिलायन्स, आयएमसी, गणेश बॅन्जो प्लास्ट, सूरज ॲग्रो, बीपीसीएल लिक्विड कार्गो जेट्टीचा समावेश आहे. उरणपासून ८ ते १० किमी सागरी अंतरावर भाऊचा धक्का, ११ किमीवर गेट वे ऑफ इंडिया, ६ किमी सागरी अंतरावर अतिसंवेदनशील बुचर आयलँड आहे. येथूनच तेलवाहू जहाजांची वाहतूक केली जाते. सीलिंक, वाशी खाडी पूल येथून जवळच आहे. रासायनिक व संवेदनशील प्रकल्पात दुर्घटना घडल्यास ३० किमी परिघातील परिसराला धोका संभवतो. यावरून हा परिसर अतिसंवेदनशील असल्याचे अधोरेखीत होते. मात्र, सागरी गस्तीसाठी नवी मुंबईपोलिसांकडे अवघ्या तीन  साध्या स्पीड बोटी आहेत. कोस्ट गार्ड आणि नौदल गस्त घालत असले, तरी ती खोल समुद्रात जास्त असते. मग, किनाऱ्याच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न आहे.

 

Web Title: what about the security of navi mumbai including uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.