पाठबळ द्यायला गेले अन् मिळाली उमेदवारीची भेट; घणसोलीत ऐनवेळी बदलला भाजपचा उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:59 IST2026-01-02T12:59:02+5:302026-01-02T12:59:27+5:30
एकाच पॅनलमध्ये असूनही अनेक उमेदवारांकडून सुरक्षित प्रभागाला पसंती दिली जात आहे.

पाठबळ द्यायला गेले अन् मिळाली उमेदवारीची भेट; घणसोलीत ऐनवेळी बदलला भाजपचा उमेदवार
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : घणसोली प्रभाग ९ मध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी गेलेल्या राजू थोरात यांनाच महापालिका निवणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी मिळाली. भाजपकडून उमेदवारी मिळत असलेल्या सुनील मस्कर यांनी ९ ड मधून असमर्थता दाखवल्याने त्यांना पाठबळ देणाऱ्या समर्थकांची नाईकांच्या व्हाईट हाऊसमध्ये बैठक सुरू होती. त्यामध्ये उमेदवार स्वतःच प्रभाग बदलून मागत असल्याने त्याची उमेदवारीच रद्द करून संजीव नाईकांचे समर्थक थोरात यांच्या हाती उमेदवारी अर्ज पडला.
एकाच पॅनलमध्ये असूनही अनेक उमेदवारांकडून सुरक्षित प्रभागाला पसंती दिली जात आहे.
शिंदेसेनेत प्रवेश करून भरला पत्नीचा अर्ज
या प्रभागात भाजपने कृष्णा पाटील, निर्मला पाटील, योजना कदम व सुनील मस्कर यांना उमेदवारी निश्चित केली होती. त्यांच्या विरोधात इतरही उमेदवार असले तरीही मुख्य लढत ही शिंदेसेनेचे प्रशांत पाटील, सौरभ शिंदे, दीपाली सकपाळ, मनसेतून मंदा गलुगडे, उद्धवसेनेतून गीता सणस अशी होणार आहे. मात्र, पॅनल एकच असतानाही केवळ प्रभाग ड मधून सौरभ शिंदेंच्या विरोधात उमेदवारी घेण्यास सुनील मस्कर यांनी असमर्थता दाखवली.
मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी पाठबळ देण्यासाठी गेलेल्या थोरात यांनाच उमेदवारी चालून आली. त्यांनी अर्जही भरला. या गोंधळानंतर मस्कर यांनी तासाभरातच शिंदेसेनेत प्रवेश करून पत्नी वैशाली मस्कर यांचा त्याच पॅनलमध्ये क प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला आहे.