उमेदवार यादी तर आली नाहीच, एबी फॉर्मचेही काही समजेना; भाजपही आज देणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:11 IST2025-12-29T11:11:24+5:302025-12-29T11:11:38+5:30
बंडखोरी हाेऊ नये व उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर लढू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

उमेदवार यादी तर आली नाहीच, एबी फॉर्मचेही काही समजेना; भाजपही आज देणार अर्ज
नवी मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असतानाही एकाही राजकीय पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. खासगीत सर्वांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाचे ए. बी. फॉर्मही शेवटच्या दिवशीच देण्याची रणनीती निश्चित करण्यात आली आहे.
बंडखोरी हाेऊ नये व उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर लढू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. शिंदेसेना व भाजपमध्ये सर्वाधिक चुरस आहे. बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी शेवटपर्यंत नावे समजून द्यायची नाहीत, असे ठरविण्यात आले. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस, मनसे यांचे एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे. याशिवाय काही समविचारी पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे, असे सांगण्यात येते.
भाजपही आज देणार अर्ज
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही सोमवारपासून ए. बी. फाॅर्म दिले जाणार आहेत.
सर्व उमेदवारांना तयारी करण्याचे सांगितले असून, अधिकृत उमेदवारी शेवटच्या क्षणी सांगण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी आमच्या चर्चा झाल्या आहेत. उमेदवारी निश्चिती जवळपास पूर्ण झाली असून, आम्ही एकत्र लढणार असून, योग्यवेळी ए.बी. फॉर्म देण्यात येतील.
प्रवीण म्हात्रे, ऐरोली जिल्हाप्रमुख उद्धवसेना
उमेदवारी अर्जांची छाननी करून उमेदवार निश्चिती केली आहे. २९ व ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरले जातील.
विजय नाहटा, उपनेते शिंदेसेना