कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:45 IST2025-12-26T06:45:17+5:302025-12-26T06:45:39+5:30
अनंत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत मतदारांना खूश करण्यासाठी प्रभागातील काही समाजसेवक, माजी नगरसेवकांसह इच्छुकांकडून ...

कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
अनंत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत मतदारांना खूश करण्यासाठी प्रभागातील काही समाजसेवक, माजी नगरसेवकांसह इच्छुकांकडून थेट वातानुकूलीत रेल्वे, बस व विमानातून धार्मिक देवदर्शन, पिकनिक सहली, विविध वस्तूंच्या भेटी, वैद्यकीय आणि आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
काही गर्भश्रीमंत भावी उमेदवारांकडून मतदारांना विविध वस्तूंचे वाटप आणि एसटी, वातानुकूलित रेल्वे व खासगी बसमधून देवदर्शन, पर्यटन सुरू आहे.
वारकऱ्यांना थेट विमानातून काशी विश्वेश्वराच्या आणि अयोध्येला श्री प्रभू रामाच्या दर्शनाचा लाभ मिळाला आहे. निवडणुका अनेक वर्षे लांबल्यामुळे मतदारसंघात हवशे, नवशे आणि गवशे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भाऊगर्दीत विजय पक्का करण्याची चढाओढ लागली आहे.
शिर्डी, महाबळेश्वर, गोवा अशा ठिकाणी पर्यटक खासगी बस भरून जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. नवी मुंबईतील नवख्या उमेदवारांसह काही माजी नगरसेवकांचे शहापूर, अलिबाग, नागाव, नेरे, वाजे, खोपोली, पाली, माणगाव, जाम्बुर्डे, कर्जत, मुरुड, जंजिरा, म्हाडस, मुरबाड, बदलापूर परिसरात फार्म हाऊस आहेत. या फार्म हाऊसवर खासगी बसमधून मतदारांचे पर्यटन घडविण्यात येत आहे. पर्यटन करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक भरणा आहे.