मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत धार्मिक वाद भडकवण्याची शक्यता; बंदोबस्त देण्याची मंत्री सरनाईक यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 23:05 IST2026-01-14T23:05:07+5:302026-01-14T23:05:38+5:30
भाजपच्या कार्यालयात घुसून तरुणांना केली मारहाण

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत धार्मिक वाद भडकवण्याची शक्यता; बंदोबस्त देण्याची मंत्री सरनाईक यांची मागणी
मीरारोड - मीरा भाईंदर मधील निवडणूक आता पर्यंत शांततेने पार पडली असली तरी गुरुवारच्या मतदानाच्या अनुषंगाने समाजकंटक राजकीय प्रवृत्तीं कडून धार्मिक तेढ तणाव भडकवण्याची शक्यता पाहता शहरात गस्त वाढवण्यासह धार्मिक स्थळांना सुरक्षा द्या व सोशल मीडियावर लक्ष ठेवा अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकांना मोकळेपणाने मतदान करता यावे यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना लेखी निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
मीरा भाईंदर शहरात गेल्या काही वर्षात स्वार्थ साधण्यासाठी कुख्यात दाखलेबाज गुन्हे असलेले भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीचे समाजकंटक सक्रिय आहेत. शहरात सातत्याने धार्मिक, जातीय व भाषा - प्रांत वरून वाद, द्वेष व तेढ निर्माण करत आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्याची सविस्तर व गोपनीय माहिती आणि जुने रेकॉर्ड संदर्भ म्हणून तपासून घेण्यास मंत्री यांनी सांगितले आहे.
मीरा भाईंदर शहर हे विकास आणि व्यवसायाच्या प्रगतीपथावर असून मिनी भारत म्हणून ओळखले जाते. येथील नागरिक हे प्रेमळ, एकोप्याने राहणारे व देशाच्या प्रगतीसाठी झटणारे आहेत. मात्र काही कारस्थानी समाज कंटक हे नेहमीच धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचे गेल्या काही वर्षातील विविध घटनांवरून उघड झाले आहे. शहराला आणि नागरिकांना बदनाम करण्यासह लोकांचे सामाजिक व आर्थिक नुकसान होऊ नये. मतदान शांततेत व्हावे याची मोठी जबाबदार पोलीस, महापालिका व आचार संहिता पथकांवर आहे.
त्यामुळे शहरातील सर्व धार्मिक स्थळ परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवावा. सीसीटीव्ही सक्रिय ठेवावेत. शहरातील गस्त सर्वत्र वाढवावी. सोशल मीडिया वर बारकाईने लक्ष ठेवावे कारण त्याचा वापर प्राधान्याने केला जातो. अश्या प्रवृत्तीच्या समाजकंटक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी मंत्री सरनाईक यांनी पत्रात केली आहे.