दुबार, बोगस मतदारांचा मनसेने योजला ‘कार्यक्रम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:21 IST2026-01-08T09:21:02+5:302026-01-08T09:21:02+5:30
दुबार, बोगस मतदारांची यादी निवडणूक विभागाकडे दिलेली आहे.

दुबार, बोगस मतदारांचा मनसेने योजला ‘कार्यक्रम’
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :मनसेने दुबार, बोगस मतदारांची यादी देऊनही निवडणूक आयोगाकडून ती हटवलेली नाहीत. त्यामुळे अशा मतदारांना केंद्रावर पकडले गेल्यास त्यांचा नियोजित कार्यक्रम होईल, तिथे उद्धवसेना आणि मनसेची फौज असेल, असा इशारा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
दुबार, बोगस मतदारांची यादी निवडणूक विभागाकडे दिलेली आहे. त्यात महापालिका आयुक्तांच्या नेरूळ येथील निवासस्थानावर नोंद असलेल्या १५७ मतदारांचाही समावेश आहे. ते मतदानाच्या दिवशी मतदान करताना त्यांच्या नियोजित सत्कारासाठी उद्धवसेना व मनसेची फौज सज्ज असेल, असा इशारा काळे यांनी दिला.
मतदारांच्या पावत्या आयुक्तांनी पोहोचवाव्यात
महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर नोंद असलेल्या संशयास्पद मतदारांच्या पावत्याही तयार झाल्या आहेत. त्यापैकी कोणाचाही पूर्ण पत्ता नसल्याने हे मतदार नेमके कोण, याची खात्री पटलेली नाही. त्यामुळे आयुक्तांनीच अदृश्य असलेल्या त्या मतदारांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पावत्या पोहोचवाव्यात, अशी मागणीही करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.