शिंदेसेनेच्या दाम्पत्य उमेदवारांवर गुन्हा, मुलास अटक प्रचार संपताच हाणामारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 23:15 IST2026-01-14T23:12:38+5:302026-01-14T23:15:16+5:30
भाजपच्या कार्यालयात घुसून तरुणांना केली मारहाण

शिंदेसेनेच्या दाम्पत्य उमेदवारांवर गुन्हा, मुलास अटक प्रचार संपताच हाणामारी सुरू
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीचे सत्र सुरू झाले आहे. रात्री घणसोलीत शिंदेसेना आणि भाजपचे दोन गट आपसांत भिडल्यानंतर बुधवारी मारहाण प्रकरणात चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांसोबत वाद घातल्याप्रकरणी शिंदेसेनेच्या उमेदवार असलेले दाम्पत्य आणि त्यांच्या मुलासह जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला. मनोहर मढवी, विनया मढवी या उमेदवारांसह त्यांचा करण मढवी अशी त्यांची नावे असून, यात करण मढवी याला अटक करण्यात आली आहे.
ऐरोली सेक्टर १६ येथे बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. तिथल्या भाजपच्या कार्यालयात जाऊन तिथे कॅरम खेळत बसलेल्या तरुणांना करण व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत व त्यांचे अधिकारी पथक चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी शिंदेसेनेचे ऐरोलीतील उमेदवार मनोहर मढवी व पत्नी विनया मढवी यांनी पोलिसांसोबत वाद घालून तपासात अडथळा केला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून मनोहर मढवी यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी मनोहर मढवी, विनया मढवी, करण मढवी व त्यांच्या काही साथीदारांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी सक्त ताकीद दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
यापूर्वी कोपरखैरीत शिंदेसेना आणि भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी झाली आहे. घणसोली-कोपरखैरणे परिसरात नवी मुंबई बाहेरील गुंड प्रवृत्तीचे माणसं आल्याचे सांगण्यात येत असतानाच हा प्रकार घडल्याने पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगली आहे. याशिवाय वाशी सेक्टर-९ परिसरात शिंदेसेनेकडून पैसे वाटण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या हाेत्या. याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी धाव घेतल्यानंतर तणाव वाढला होता. येथे शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केल्याने पुढील अनर्थ टळला.