उमेदवार सांगतो, "मतदारांनो मला आर्थिक मदत करा"; बसपाच्या उमेदवाराचे अनोखे आवाहन
By वैभव गायकर | Updated: May 5, 2024 15:32 IST2024-05-05T15:22:20+5:302024-05-05T15:32:09+5:30
Lok Sabha Election 2024 : मायावतींच्या बसपाने देखील मावळ मधून उमेदवारी अर्ज राजाराम पाटील यांच्या रूपाने भरला आहे.

उमेदवार सांगतो, "मतदारांनो मला आर्थिक मदत करा"; बसपाच्या उमेदवाराचे अनोखे आवाहन
- वैभव गायकर
पनवेल : साधारणतः कोणत्याही निवडणुका म्हटल्या कि आर्थिक गणितांची जुळवाजुळव करावी लागते. बहुतांशी वेळेला मुख्य उमेदवार कोट्याधीश असल्याचे पहावयास मिळते. मावळ लोकसभा मतदार संघात 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मायावतींच्या बसपाने देखील मावळ मधून उमेदवारी अर्ज राजाराम पाटील यांच्या रूपाने भरला आहे.
निवडणूक लढवत असताना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मतदारांकडूनच आर्थिक मदतीचे अवाहन राजाराम पाटील यांनी केले आहे. लोकशाही टिकविण्यासाठी मी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे राजाराम पाटील यांनी सांगितले. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे स्वतः 250 कोटींचे मुख्य उमेदवार आहेत. त्यांच्या पाठोपाठ दुसरे उमेदवार संजोग वाघेरे पाटील देखील कोट्याधीश आहेत. या कोट्यधीश उमेदवारांसोबत लढण्यासाठी आर्थिक बळाची देखील गरज आहे.त्यामुळे मला विजयी करण्यासाठी मतदान तर कराच पण पैशाचे दान देखील करा असे अवाहन मावळ लोकसभा मतदार संघातील बसपाचे उमेदवार राजाराम पाटील यांनी मतदारांना केले आहे.
राजाराम पाटील यांनी 2019 साली मावळ मधून बहुजन वंचित आघाडीच्या वतीने निवडणुक लढवली होती.त्यावेळी पाटील यांना 76 हजार मते मिळाली होती. यावेळेला राजाराम पाटील यांना बहुजन वंचित आघाडीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बसपा मध्ये प्रवेश करीत मावळ मधून उमेदवारी मिळवली आहे. राजाराम पाटील यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत पाटील यांना 70 हजारांची मदत नागरिकांनी केली आहे.