नऊ वर्षांनंतर गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 06:03 IST2019-12-23T06:03:34+5:302019-12-23T06:03:48+5:30
महाराष्ट्रात खंडग्रास स्थिती : सकाळी ८ वाजता दोन ते तीन मिनिटे दिसणार

नऊ वर्षांनंतर गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण!
मुंबई : यंदाच्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण गुरुवारी होणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार असून, महाराष्ट्रासह उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
सोमण यांनी सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्र्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला ‘फायर रिंग’ असेही म्हणतात. अशा वेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. २६ डिसेंबर रोजी अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील कोइम्बतूर, धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगळूरु, मंजेरी, उटीसह देशातली इतर भागात दिसणार आहे.
राज्यातून ‘ग्रहणदर्शन’
राज्यात सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकले गेलेले दिसणार आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. या वेळांमध्ये स्थानपरत्वे काही प्रमाणात बदल होवू शकतो.
ही घ्या काळजी : सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. ग्रहणचष्म्यातूनच ते पाहावे वा थेट सूर्याकडे न पाहता छिद्र असलेल्या चाळणीतून पांढऱ्या कागदावर सूर्याची प्रतिमा घेऊन त्यात निरीक्षण करावे. दुर्बिण वा द्विनेत्रीतून पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा.
गैरसमज टाळा : ग्रहण पाहू नये, या वेळेत जेवू नये, झोपू नये, असे समजले जाते. त्यात काहीही तथ्य नसल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हा नैसर्गिक आविष्कार आहे. सावल्यांचा खेळ आहे.