Kanhaiya Kumar write facebook post before the result | द्वेषाच्या राजकारणामुळे तुटलेली नाती पुन्हा जोडा; कन्हैया कुमार याचे आवाहन 

द्वेषाच्या राजकारणामुळे तुटलेली नाती पुन्हा जोडा; कन्हैया कुमार याचे आवाहन 

नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून बिहारच्या बेगुसराय लोकसभा जागेवर निवडणूक लढविणारा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने निकालाबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहून जनतेला आवाहन केले आहे. उद्या निवडणुकीत जे व्हायचं असेल ते होईल पण येणाऱ्या काळात समाजात द्वेष पसरविण्याचं राजकारण हरणं गरजेचे आहे. अशा राजकारणामुळे फक्त लोकशाही कमकुवत होणार नाही तर समाजात फूट पडली जाईल. नेत्यांच्या राजकारणामुळे आपापसात भिडणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकदा थंड डोक्याने विचार करावा की मी जे काही करतोय त्याने माझा फायदा किती आणि नुकसान किती आहे. मतभेदाला गुन्हा किंवा अपमान मानण्याची मानसिकता लोकशाहीला कमकुवत करते इतकचं नाही तर नातेवाईकांमध्ये विष पेरण्याचं काम करते. 

कन्हैया कुमारने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, देशाचा अर्थ काय आहे? जे देशात राहतात ते देश बनवतात. त्यांचे हित देशाचे हित आहे. जर गरिब शेतकरी, मजूर, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला यांना नुकसान पोहचवणारी धोरणं आणली तर त्याचे नुकसान देशाला होईल. या धोरणांचा विरोध करणे हे देशप्रेम आहे. ज्या लोकांनी देशप्रेमाला नेताप्रेम केलं आहे त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. ते त्यांच्या फायद्यासाठी नातेवाईकांमध्ये विष पेरण्याचं काम करतात. 

ज्या मित्राशी, शेजाऱ्याशी किंवा नातेवाईकांशी राजकारणामुळे भांडणे झाली आहेत. त्यांच्याशी बोलणं बंद झाले आहे. अशांना आज फोन करा, त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करा, त्यांना सांगा अशा राजकारणामुळे तुटेल एवढं आपलं नातं कमकुवत नाही. मतभेद असतील तर त्याचा सन्मान करा ही लोकशाही आहे. जर देशातील नागरिकांनी द्वेष आपल्या मनातून काढून टाकला तर समाजात द्वेषाचं राजकारण करणारे स्वत: हरतील असंही कन्हैया कुमार याने सांगितले. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. बिहारच्या बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून कन्हैया कुमार निवडणूक लढवत आहे. विद्यार्थी नेता म्हणून कन्हैया कुमार देशभरात प्रसिद्ध झाला आहे. कन्हैयाविरोधात भाजपाकडून गिरीराज सिंह निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे 23 मेच्या निकालात बेगुसराय लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kanhaiya Kumar write facebook post before the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.