“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 16:09 IST2025-05-18T16:09:39+5:302025-05-18T16:09:49+5:30
Jyoti Malhotra: तिला भेटायला गेलो असता ती म्हणाली की, ते मला उद्या किंवा परवा सोडतील, असे ज्योतीच्या वडिलांनी म्हटले आहे.

“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
Jyoti Malhotra: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने देशातही अनेक कारवाया तीव्र केल्याचे पाहायला मिळत आहे. यातच हरयाणाची ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात पकडलेल्या सहा भारतीय नागरिकांमध्ये तिचा समावेश आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा असून, ज्योतीला फसवले जात असल्याचा दावा तिच्या वडिलांना केला आहे.
एखादी व्यक्ती कुठेतरी फिरायला गेली तर त्याचा अर्थ असा नाही की तो हेरगिरी करायला सुरुवात करेल. ज्योती दूतावासाची परवानगी घेऊन, पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन गेली होती, ती अशीच गेली नव्हती. तिला फसवले जात आहे. ज्योती हिसारमध्ये राहते, कधी ती दिल्लीला जाते. पण ३ ते ४ दिवसांत परत येते. ज्योतीच्या खात्यात पैसे नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५, २० किंवा २५ हजार रुपयांची कमाई करते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ज्योती पैसे कमावते, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.
ते मला उद्या किंवा परवा सोडतील
ज्योतीला व्हिसा देण्यापूर्वी तिची घरी चौकशी करण्यात आली. सर्वकाही व्यवस्थित असल्याचे आढळल्यानंतर ज्योतीला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्यात आली. दोन लोकांना साक्षीदार बनवण्यात आले. सर्व काही कायदेशीर प्रक्रियेतून घडले आहे. ज्योती २ ते ३ वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेली होती. तिच्या अटकेबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आले नव्हते. गेल्या गुरुवारी घरी बरेच लोक आले होते, जेव्हा मला तिच्या अटकेची बातमी मिळाली, तेव्हा तिला भेटून आलो. ती म्हणाली की, काही हरकत नाही, ते मला उद्या किंवा परवा सोडतील.
दरम्यान, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेली ज्योती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाची युट्यूब चॅनल चालवते. ज्योतीने २०२३ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. या काळात तिची भेट पाकिस्तान उच्चायुक्ताचा कर्मचारी एहसान-उर-रहीम ऊर्फ दानीशशी झाली. त्याच्याशी तिचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. दानीशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंटांशी झाली. यांत अली अहसन व शाकीर ऊर्फ राणा शाहबाज यांचा समावेश होता. दानीश, अली अहसन यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली.