महाराष्ट्रात लोकांपेक्षा मतदार अधिक कसे?; राहुल गांधींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 06:32 IST2025-02-08T06:31:18+5:302025-02-08T06:32:23+5:30

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

How come there are more voters than people in Maharashtra?; Rahul Gandhi warns of going to court | महाराष्ट्रात लोकांपेक्षा मतदार अधिक कसे?; राहुल गांधींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

महाराष्ट्रात लोकांपेक्षा मतदार अधिक कसे?; राहुल गांधींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

-आदेश रावल
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये प्रौढ नागरिकांच्या संख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदारांची भर कशी काय घालण्यात आली, असे प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत उपस्थित केले. वाढीव मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाने उत्तर न दिल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही गांधी यांनी दिला.

राहुल म्हणाले की, हा आरोप नाही. आकड्यांवर आधारित वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या पाहिली तर ती हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतकी आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी सर्वांना उपलब्ध करून द्यावी. म्हणजे या विषयातील सर्व मुद्दे स्पष्ट होतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी ज्या मतदारांची नोंदणी झाली त्यातील बहुतांश लोकांनी भाजपला मतदान केले. कारण विरोधी पक्षांनी आपला मतदानाचा टक्का कायम राखण्यात यश मिळविले. त्यावरून आम्ही हा निष्कर्ष काढला आहे.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत हेही पत्रपरिषदेला उपस्थित होते. राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने दिली पाहिजेत. अन्यथा आयोग केंद्र सरकारचा गुलाम आहे अशी प्रतिमा तयार होईल.

पाच वर्षांत ३२ लाख, अन् पाचच महिन्यांत ३९ लाख

सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढ व्यक्तींची संख्या ९.५४ कोटी आहे, तर मतदारसंख्या ९.७ कोटी आहे. येथे मतदारांची संख्या अधिक आहे. ही संख्या कशी वाढली याचेच आम्हाला उत्तर हवे आहे. लोकसभा निवडणुकांनंतर पाचच महिन्यांत महाराष्ट्रात ३९ लाख मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. त्याआधी २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत महाराष्ट्रामध्ये ३२ लाख मतदारांची नावे नोंदविली गेली.

निवडणूक आयोग म्हणतो, प्रत्येक प्रश्नाचे लेखी उत्तर देणार

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे लेखी स्वरूपात, तसेच आकडेवारीसह सविस्तर उत्तर दिले जाईल, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी म्हटले आहे. निवडणूक आयोग राजकीय पक्ष, मतदार या सर्वांनी केलेल्या सूचनांची, उपस्थित केलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतो. मतदारांची नावे नोंदण्याची समान पद्धती देशभर राबविली आहे, असेही आयोगाने म्हटले.

लक्ष भरकटवण्याचे काम

राहुल गांधी यांच्या आरोपांचे उत्तर निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिलेले आहे. किती मतदार महाराष्ट्रात वाढले, कसे वाढले हेही आयोगाने सांगितले आहे. आता राहुल गांधी जे आरोप करत आहेत ते दिल्लीत काँग्रेसचा उद्याच्या निकालात दारुण पराभव होणार असल्याने ते लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत. ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढत राहतील तोवर जनतेचे समर्थन त्यांना कधीही मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: How come there are more voters than people in Maharashtra?; Rahul Gandhi warns of going to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.