Hathras: BJP has a home base from JD (U) | हाथरस : भाजपला जदयुकडून घरचा आहेर

हाथरस : भाजपला जदयुकडून घरचा आहेर

ठळक मुद्दे जदयुचे नेते त्यागी म्हणाले की, हाथरस प्रकरणातील मुलीला गंभीर परिस्थितीनंतरही एम्समध्ये दाखल करण्यात आले नाही.

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीची लगबग सुरू असताना दलित तरुणीच्या मृत्यूप्रकरणावरून भाजपचा सहकारी पक्ष जदयुनेच आता योगी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांचा हस्तक्षेप हा योगी सरकारसाठी लाजिरवाणा असल्याची टीका जदयुचे महासचिव के. सी. त्यागी यांनी केली आहे.

त्यागी म्हणाले की, दलित आणि उपेक्षितांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हाथरसमध्ये जे झाले ते उत्तर प्रदेश सरकारसाठी लाजिरवाणे आहे. एका दलित तरुणीला न्याय देण्यासाठी जर पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागत असेल, तर यापेक्षा लाजिरवाणी बाब एखाद्या राज्य सरकारसाठी काय असू शकते? दिल्लीतील नेतृत्वाने हस्तक्षेप केल्याशिवाय या देशातील दलित आणि वंचितांना न्याय मिळू शकत नाही काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

जदयुचे नेते त्यागी म्हणाले की, हाथरस प्रकरणातील मुलीला गंभीर परिस्थितीनंतरही एम्समध्ये दाखल करण्यात आले नाही. पीडितेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोक तिचे अंत्यदर्शन करू शकले नाहीत. कुटुंबाला अंत्यसंस्कार करू दिले नाही. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस हास्यविनोद करीत होते. अत्याचार झालाच नाही, असे दावे आता केले जात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत हाथरसचा मुद्दा विरोधक उचलून धरणार आहेत. राजदच्या निशाण्यावर जदयु आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजपसोबतच जदयुवरही निशाणा साधला आहे. बिहारमध्ये जवळपास १६ टक्के मतदार दलित आहेत. अशा वेळी जदयुला फटका बसण्याची भीती वाटत आहे.

पीडितेच्या काकांच्या छातीवर जिल्हाधिकारी यांनी मारली लाथ
हाथरस : मुलीच्या नातेवाईकांना पोलिसांनी अजूनही घरात कोंडून ठेवले असून तिच्या काकाच्या छातीवर जिल्हाधिकारी प्रवीण लष्कर यांनी लाथ मारली. त्यामुळे काका बेशुद्ध पडले. पीडितेच्या घरातील सर्वांचे मोबाइल काढून घेण्यात आले आहेत अशी माहिती त्या गावातून लपूनछपून बाहेर आलेल्या एका मुलाने पत्रकारांना दिली.
या मुलाने सांगितले की, हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण लष्कर यांनी दलित मुलीच्या काकाच्या छातीवर लाथ मारली. मुलीच्या घरच्या मंडळींनी आपल्याला पत्रकारांकडे पाठविले असल्याचा दावाही या मुलाने केला. पीडितेच्या घरच्या मंडळींना पत्रकारांशी बोलण्यास पोलिसांनी मज्जाव केला आह.े अशी माहितीही या मुलाने दिली. मात्र आपण कोणालाही लाथ मारली नसल्याचे प्रवीण लष्कर यांनी म्हटले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hathras: BJP has a home base from JD (U)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.