Father of Malegaon Blast Victim Files Plea Questioning Sadhvi Pragya’s Candidature From Bhopal LS Seat | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी विरोधात याचिका
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी विरोधात याचिका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वी तब्येतीचे कारण पुढे करत एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवला आहे. त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. नासीर अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. 


दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपाकडून काल मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढण्यास तयार असून या कामाला सुरुवात केल्याचे म्हटले आहे. 

भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 


Web Title: Father of Malegaon Blast Victim Files Plea Questioning Sadhvi Pragya’s Candidature From Bhopal LS Seat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.