केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:55 IST2025-08-07T16:03:43+5:302025-08-07T16:55:45+5:30
Karnataka Election Commission: राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.

केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे पत्रकार परिषदेमधून प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा दावा केला होता. दरम्यान, या दाव्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.
मतदार यादीत अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना हटवण्याबाबत केलेल्या आरोपांबाबत सहीनिशी शपथपत्र सादर करण्याचे आदेश कर्नाटक निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
याबाबत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी हे मतदार यादीतील कोणत्या नावांना बनावट मानतात, त्यांचा पार्ट क्रमांक आणि सिरियल नंबर काय आहेत. तसेच हे दावे ते वैयक्तिक माहितीच्या आधारावर देह आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनी दिलेली माहिती खोटी आढळल्यास त्यांच्यावर आरपी अॅक्ट १९५० च्या कलम ३१ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२७ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
दरम्यान, महाराष्ट्रात मतांची चोरी झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्येही मतांचा घोटाला झाले आहे. कर्नाटकमधील पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये आम्ही १६ जागा जिंकत होतो. मात्र प्रत्यक्षात आम्हाला ९ जागाच मिळाल्या. विशेषकरून बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघामधील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाख बनावट मतदार जोडले गेले. त्यामुळे भाजपाचा विजय झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
तर महाराष्ट्रातील निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याबाबत आरोप करताना राहुल गांधी म्हणाले होते की, राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे.