महायुतीबाबत मित्रपक्षांकडून भाजपला आजचा 'अल्टिमेटम'! महायुती की स्वबळ? आज होणार फैसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:22 IST2025-12-24T16:22:02+5:302025-12-24T16:22:42+5:30
उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून (दि.२३) प्रारंभ झालेला असूनही महायुतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

महायुतीबाबत मित्रपक्षांकडून भाजपला आजचा 'अल्टिमेटम'! महायुती की स्वबळ? आज होणार फैसला!
नाशिक : उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून (दि.२३) प्रारंभ झालेला असूनही महायुतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिंदेसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी भाजप शहराध्यक्षांशी चर्चा करून बुधवारपर्यंत महायुतीबाबत निर्णय घेण्याचे सूचित केले आहे. तर एका फार्म हाऊसवर झालेल्या राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांच्या बैठकीत बुधवारी (दि. २४) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटून बुधवारीच भाजपकडून निर्णय घेण्याबाबत आग्रही भूमिका मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि.२२) राष्ट्रवादीच्या आमदारांना तिष्ठत ठेवल्यानंतर आमचे ८२ विद्यमान नगरसेवकांच्या जागा तर नक्कीच राहणार असल्याचे सांगत उर्वरीत ४० जागांमधूनही काही जागा शिंदेसेना, काही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काही आरपीआयला देतानाच त्यातूनही काही आपल्याकडेच ठेवण्याचे वाटा मान्य नमूद केले होते. त्यामुळे आता मित्रपक्षांना इतक्या अत्यल्प जागांचा मिळणे नसल्याने महायुतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो बुधवारपर्यंतच घ्यावा, अन्यथा महायुतीच्या जोखडातून मुक्त होत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास मोकळे होऊ अशी मानसिकता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवरच भाजपला दोन्ही मित्रपक्षांकडून अल्टीमेटम देण्यात आला आहे. बुधवारी याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.
शिंदे शिष्टमंडळ मुंबईत
भाजपकडे सुमारे ४५ जागांची मागणी करणाऱ्या शिंदेसेनेला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी शिंदेसेनेचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, संपर्क प्रमुख विलास शिंदे मुंबईला रवाना झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि युतीने लढायचे की स्वबळावर याचा बुधवारीच निर्णय घेण्याची मागणी केली.
अजय बोरस्ते, सुनील केदार यांच्यात चर्चा
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते यांनी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याशी चर्चा करून बुधवारपर्यंत आमच्या मागणीबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले. महायुती व्हावी ही जनतेचीच इच्छा आहे. परंतु भाजपाकडून निर्णयाला विलंब होत आहे. तो टाळावा, असे बोरस्ते यांनी सांगतले.
राष्ट्रवादीचे नेतेही मुंबईत
राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ, दिलीप बनकर, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, शराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी भाजपाकडे ४० जागांची मागणी करण्याबाबत चर्चा झाली. भाजपाकडून अद्याप निर्णय न आल्याने बुधवारी (दि. २४) सर्व आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. तसेच प्रसंगी स्वबळावर लढण्याची मागणी करणार आहेत.