घर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात तहसिलसमोर सिटू ची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:25 IST2020-08-17T16:23:38+5:302020-08-17T16:25:16+5:30
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य घर कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सिटू संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१७) इगतपुरी तहसिलदार कार्यालयासमोर कामगार व सिटू संघटनेचे पदाधिकारी यांनी भर पावसात जोरदार निदर्शने करीत मागण्या पुर्ण करण्याविषयी तहसिलदारांना निवेदन दिले.

घर कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करतांना घर कामगार.
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य घर कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सिटू संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१७) इगतपुरी तहसिलदार कार्यालयासमोर कामगार व सिटू संघटनेचे पदाधिकारी यांनी भर पावसात जोरदार निदर्शने करीत मागण्या पुर्ण करण्याविषयी तहसिलदारांना निवेदन दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक कामगारांवर या काळात उपासमारीची वेळ आली असून घरकाम करणाऱ्या या कामगारांच्या मागण्या देखील शासनाने पुर्ण केल्या नसल्यामुळे सटू संघटनेच्या माध्यमातून इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्व घर कामगारांना कल्याणकारी मंडळाकडुन लॉकडाउन अथवा कंटेनमेंट कालावधीसाठी दहाहजार रुपये महीना या दराने अपत्ती अनुदान देण्यात यावे, लॉकडाउन कालावधीसाठी घरकामगारांना पगार देण्याबद्दल कामगार आयुक्त व विकास आयुक्त यानी विशेष सुचना जाहीर कराव्यात,केंद्र सरकारप्रमाणे रेशनकार्ड नसलेल्यांना आधार कार्डवर रेशन देणे सुरु ठेवावे, आठवड्याची पगारी सुट्टी, १५ दिवसाची पगारी वार्षिक अर्जित रजा आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार परमेश्वर कासुळे व इगतपुरीचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना देण्यात आले.
यावेळी सिटु संघटनेचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, कांतिलाल गरु ड, सदाशिव डाके, निवृती कडु, पांडु कडु, आप्पासाहेब भोले, संध्या जोशी, जाई घाटाळ, वंदना वालझाडे, सोनल गोसावी, मंदा शीगोळे, उर्मिला तावरे, ज्योती पाथरे आदी उपस्थित होते.